महाराष्ट्राच्या विधानसभेत विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील सदस्यांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजुने तुफान फटकेबाजी केली जात आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवर दोन्ही बाजुने आंदोलन केल्यामुळे बुधवारी मोठा संघर्षही पाहायला मिळाला. काही आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे.
या सर्व घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सभागृहात तुफान फटकेबाजी केली आहे. त्यांनी सभागृहात केलेल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रीपदाची खुली ऑफर दिली आहे. शिवाय पंतप्रधानपदाचा उल्लेख करत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढला आहे. ज्या नेत्यामध्ये देशाचा पंतप्रधान बनण्याची क्षमता आहे, त्या नेत्याला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बनवला, त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर आपली नाराजी आहे, असं विधान जयंत पाटलांनी केलं आहे.
हेही वाचा- “हा हनिमून आणखी किती दिवस…” सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर खोचक टीका!
यावेळी जयंत पाटलांनी आपल्या भाषणात उपरोधिकपणे म्हटलं की, “माझी भारतीय जनता पार्टीबद्दल एक नाराजी आहे. महाराष्ट्रातील एक उगवता नेता… ज्याला आम्ही पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील मानत होतो. पुढील ८-१० वर्षात ते हळुहळू पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत गेले असते. अशा नेत्याला भाजपानं मुख्यमंत्रीपदापासून दूर केलं आहे. ज्या नेत्याला भविष्यात पंतप्रधान होण्याचा योग येऊ शकतो, असं आम्ही समजत होतो, त्या नेत्याला महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री करून भाजपाने महाराष्ट्राच्या एका नेत्याचा अपमान केला आहे.”
एकनाथ शिंदेंना मविआकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर…
“भारतीय जनता पार्टीने मनावर दगड ठेऊन आमच्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असेल तर, मी मुख्यमंत्र्यांना सांगतो, तुम्ही इकडे या… मनावर दगड ठेवण्याची कुठलीही भानगड न करता, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू. याला कुणी नकार देतील, असं मला वाटत नाही. तुमच्यातील सर्व गुण पाहता आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ” असा खोचक टोला जयंत पाटलांनी लगावला आहे.