राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल ४० दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. भाजपा आणि शिंदे गटाच्या प्रत्येक नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथविधी होऊन २४ तास उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप खातेवाटप झाले नाहीत. महत्त्वाच्या खात्यांसाठी भारतीय जनता पार्टी आग्रही असल्याची माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरू आता शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे.
या सर्व राजकीय परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंडखोर आमदारांना उपरोधिक टोला लगावला आहे. शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टीसोबत सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे कमी महत्त्वाची खाती मिळाली किंवा मंत्रीपद मिळालं तर वाईट वाटून घेऊ नये. हिंदुत्वासाठी तेवढा त्याग करणं आवश्यक आहे, असा टोला जयंत पाटलांनी लगावला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- “आतापर्यंत शांत होतो, पण…” पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून संजय राठोड यांचा गंभीर इशारा
राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारावरून आणि शिंदे गटातील नाराजीबाबत विचारलं असता जयंत पाटील म्हणाले की, “बऱ्याच शिंदे समर्थक आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे समर्थक आमदार भारतीय जनता पार्टीसोबत गेले आहेत. त्यामुळे हिंदुत्वासाठी तेवढा त्याग करणं आवश्यक आहे. कमी महत्त्वाची खाती मिळाली तर हिंदुत्वासाठी तेवढा त्याग करणं अपेक्षित आहे, असं मला वाटतं. त्यात त्यांनी वाईट वाटून घेण्याचं काहीही कारण नाही. काही आमदारांना मंत्रीही होता नाही आलं तर, तेही वाईट वाटून घेणार नाहीत, अशी मला अपेक्षा आहे” असा उपरोधिक टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.