शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आता निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना वेगळं नाव आणि निवडणूक चिन्ह बहाल केलं आहे. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच शिवसेना पक्षात फूट पडल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट विधान केलं आहे. शिवसेना पक्षात झालेली बंडखोरी ही शिवसेनेची अंतर्गत बंडखोरी कधीच नव्हती, ही भाजपा पुरस्कृत बंडाळी होती, असं विधान जयंत पाटलांनी केलं आहे.
शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, “भारतीय जनता पार्टी फार काळ सत्तेच्या बाहेर राहू शकत नाही, त्यामुळे त्यांनी पडेल ती किंमत मोजून शिवसेना फोडली. आता महाराष्ट्रातील जनता पूर्णपणे भाजपाच्या विरोधात गेली आहे. शिवसेनेचा जो फुटीर गट आहे, त्याचाही महाराष्ट्रात पदोपदी निषेध व्यक्त केला जात आहे. आता बंडखोरीचं खापर फोडण्यासाठी कुणीतरी हवं, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केला जातोय. राष्ट्रवादीने शिवसेना आणि काँग्रेसच्या आघाडीला पुढाकार घेऊन साथ दिली. शरद पवारांनीच महाविकास आघाडीची स्थापना केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीनेच त्याच्याविरोधात कटकारस्थान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
काही झालं तरी राजकारणात प्रोफेशनली टिकायचं असेल तर पुढचा पक्ष प्रोफेशनली फोडला पाहिजे, हा उद्देश ठेवून भारतीय जनता पार्टीने शिवसेना फोडली. शिवसेना संपूर्ण संपवण्याचं कारस्थान रचलं. आता त्यांचं चिन्ह आणि नावही काढून घेतलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आहे. आता ती कोणाच्या घरात सापडेल? हे थोड्याच दिवसात कळेल. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे सगळं एकनाथ शिंदेंकडे देण्याची व्यवस्था केली जाईल, याबाबत माझ्या मनात कसलीही शंका नाही, असं विधानही जयंत पाटलांनी केलं आहे.
“शिवसेना फोडण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टीचं आहे. हिंदुत्वाची मतं फुटली तर आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही, या भीतीने भाजपा ग्रासली आहे. म्हणून त्यांनी शिवसेना फोडली. यामागे दुसरं कोणतंही कारण नाही. शिवसेनेची बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती, ती भाजपाप्रणितच होती. बंडखोरीच्या काळात एकनाथ शिंदे सतत देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात होते, हे एकनाथ शिंदे यांनीच कबुल केलं आहे. याचा अर्थ जाहीरपणे हाच आहे की, शिवसेना फोडण्याचं काम भाजपानं केलं आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे दोन तुकडे करण्याचं कारस्थान भाजपानं केलं आहे,” असंही जयंत पाटील म्हणाले.