राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे मत
विद्यमान सरकार हे शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे आणि केवळ आश्वासनांची घोषणा करणारे आहे. या राज्यकर्त्यांच्या कालावधीत ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर, शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफीही फसवी असून, किती शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला हे सरकारने जाहीर करावे असे आव्हान आमदार व माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिले. राज्यकर्त्यांनी इतिहास बदलण्याचे काम करू नये, असे ते म्हणाले.
चरेगाव (ता. कराड) येथे विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आमदार मोहनराव कदम, बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, पंचायत समिती सभापती शालन माळी, रघुनाथराव माने यांची उपस्थिती होती.
जयंत पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष एकवटले आणि शेतकऱ्यांचा आक्रोश खऱ्या अर्थाने घुमल्यामुळे भाजपा सरकारला मनात इच्छा नसतानाही विरोधकांच्या एकजुटीची ताकद आणि जनसामान्यांच्या तीव्र भावनांची गांभीर्याने दखल घ्यावी लागली. परिणामी, शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाला. पण, कर्जमाफी मिळणार का? याबाबत शेतकऱ्यांमध्ये आजपर्यंत संभ्रम आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर आम्ही विधानभवन आवारात आंदोलन केले असता, बळिराजाच्या न्याय्यहक्कासाठी आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या १९ आमदारांना निलंबित करून, आमच्याविरोधात आवाज केला, तर तुमचा आवाज दाबण्यात येईल ही दडपशाही वृत्ती सरकारने दाखवून दिली.
सरकारने जुन्याच योजना नवीन नावाने सुरू करून आपल्या कामगिरीचा डांगोरा पिटणे पसंत केले असल्याची टीका पाटील यांनी केली.या वेळी बाळासाहेब पाटील देवराज पाटील, मनसिंगराव जगदाळे, सुरेशराव माने यांनी मनोगत व्यक्त केले.