आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं आहे. या अधिवेशनाला देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या अधिवेशनादरम्यान एक वेगळं चित्र पाहायला मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं भाषण सुरू असताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार दोनदा उठून सभागृहाबाहेर गेले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नाराजीनाट्यामुळेच अजित पवार जयंत पाटलांच्या भाषणादरम्यान सभागृहाबाहेर उठून गेल्याचा तर्क लावण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सर्व घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आपल्यावर अजिबात नाराज नाहीत, ते लघूशंकेसाठी सभागृहाबाहेर गेले होते, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- “…अन् पोलीस अधिकारीही भयभयीत झाले” प्रभादेवी प्रकरणावर शिवसेना नेते सुनील शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

अधिवेशनाला मिळाळेल्या प्रतिसादावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रीय अधिवेशनाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. देशातील वेगवेगळ्या भागातून फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी अधिवेशनासाठी आले होते. देशातील सर्वच राज्यातील प्रतिनिधित्व आज आम्हाला पाहायला मिळालं. केरळ, अरुणाचल प्रदेश, मणीपूर, राजस्थान, मध्य प्रदेश किंवा हरियाणा अशा सगळ्याच प्रांतातील लोकं इथे आले होते. अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला.”

हेही वाचा- “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्याच नावावर…” अध्यक्षपदाच्या निवडीनंतर अजित पवारांचं विधान

तुमचं भाषण सुरू असताना अजित पवार दोन वेळा उठून सभागृहातून बाहेर आले, ते तुमच्यावर नाराज आहेत का? असं विचारलं असता जयंत पाटील म्हणाले, “असं आहे की, कुणी लघूशंकेला गेलं तर त्याचीही बातमी करणं योग्य नाही. माझ्यानंतर शरद पवार यांचं भाषणं होतं. सर्वजण त्यांच्याच भाषणाची वाट पाहत होते. त्यामुळे शरद पवारांच्या भाषणाला उपस्थित राहता यावं, म्हणूनमाझं भाषण सुरू असताना अजित पवार लघूशंकेला जाऊन आले. अजित पवार माझ्यावर अजिबात नाराज नाहीत” अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader jayant patil statement on ajit pawar upset rmm
Show comments