पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि पुणे दौऱ्यावर आले होते. आज सकाळी त्यांनी देहू याठिकाणी तुकोबारायांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण केलं. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरून देवेंद्र फडणवीस यांच्यासह नरेंद्र मोदींनी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित केलं. पण अजित पवारांना व्यासपीठावरून भाषण संधी दिली गेली नाही. यामुळे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

अजित पवार यांना व्यासपीठावरून बोलू न देणे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही हा मुद्दा उपस्थित करत नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

हेही वाचा- भाषण करण्यापासून अजित पवारांना डावललं? देहू संस्थानच्या अध्यक्षांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, “पंतप्रधानांच्या मागील पुणे दौऱ्यातील पुणे महानगर पालिकेच्या कार्यक्रमात काही व्यक्तींना खडेबोल सुनावल्याने भाजपाने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची धास्ती घेतलेली दिसत आहे. म्हणूनच त्यांनी आज अजित पवार यांच्याविरोधात षडयंत्र करून देहू येथील कार्यक्रमात बोलू दिलं नाही. राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीचा अपमान हा पर्यायाने महाराष्ट्राचा अपमान आहे.” असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

नेमकं प्रकरण काय?
याचवर्षी मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोदी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. “काही उच्च पदावरील व्यक्ती अनावश्यक विधानं करत आहेत. अशी विधानं महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातील लोक कधीही सहन करणार नाहीत,” असे खडेबोल अजित पवारांनी कोश्यारी यांना सुनावले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. याच कारणामुळे अजित पवारांना व्यासपीठावरून बोलू दिलं नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात आहे.