वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभारण्यात येणारा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे व्यवसाय, लाखोंचा रोजगार आणि करोडो रुपयांच्या महसुलाला महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. यावरून आता राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कल्याणासाठी सुरतेवर स्वारी करून खजिना महाराष्ट्रात आणला होता. आताचे राज्यातील शासक येथे होवू घातलेला एवढा मोठा प्रोजेक्ट आणि महसूल गुजरातला देवून आले. फरक स्पष्ट व्हावा एवढाच शुद्ध हेतू,” असा टोला आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला आहे.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये, “ठेवू नका महाराष्ट्र गुजरातला गहाण, तुम्हांला छत्रपती शिवरायांची आन, दाखवा थोडी तरी अस्मिता, थोडा तरी स्वाभिमान. आज मात्र झुकली महाराष्ट्राची मान, तुडवू नका पायदळी महाराष्ट्राच्या मातीची शान.. तुम्हाला शिवरायांची आन,” असेही आव्हाड म्हणाले आहेत.

“मोदी, शाहांना नक्कीच खुश…”

फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा ट्विट करत सरकारला टोला लगावला आहे. “वेदांत फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडी सरकारने ३९ हजार कोटींची तर गुजरात सरकारने २९ हजार कोटी रुपयांची सवलत दिली होती. तरी सुद्धा हा प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरातमध्ये शिंदे सरकारने घालवला. लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले. यामुळे राज्यपाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांना आपण नक्कीच खुश केलं आहे.”