शिवसेनेचे औरंगाबादमधील खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करुन सरकारने त्यांना अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.औरंगाबादमधल्या एका कार्यक्रमात खैरेंनी, मी रुग्णाची नाडी धरुन जप केला तर रुग्ण बरा होतो असा दावा केला होता.

‘चंद्रकांत खैरे तुम्ही लोकसभेत महाराष्ट्राचं आणि पर्यायाने देशाचं प्रतिनिधित्व करतात. हा प्रयोग जवळच्या लोकांवर का नाही केला, यशस्वीपणे प्रयोग केला असता तर कदाचीत मातोश्रीवरही बाळासाहेबांसाठी आपल्याला आमंत्रण देण्यात आलं असतं,’ अशी खरमरीत टीका आव्हाड यांनी खैरेंवर केली आहे. तसंच, जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत अटकेची कारवाई होणारे चंद्रकांत खैरे पहिले लोकप्रतिनिधी ठरायला हवेत अशी सरकारकडे मागणी करताना महाराष्ट्राला पाषाण युगाकडे घेऊन जाऊ नका असंही ते म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण –
औरंगाबाद येथे सरकारकडून सुरू असलेल्या आरोग्य शिबिरात बोलताना भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नाडीवर हात ठेवून आपण त्यांना वाचवलं असतं असा अजब दावा शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता.

काय म्हणाले होते खैरे –
प्रमोदजी जेव्हा रूग्णालयात होते तेव्हा मला गोपीनाथ मुंडे म्हटले होते तू काहीतरी कर. सिद्धिविनायक मंदिरात जा काहीतरी फूल वगैरे घेऊन ये. माझ्याकडे एक पुडी होती. तो अंबाबाईचा अंगारा होता, तो मी राहुलकडे दिला. राहुलला सांगितलं प्रमोदजींच्या उशीखाली ही पुडी ठेव. प्रमोद महाजन यांच्या उशीखाली ती पुडी ठेवल्यावर मी तिथे गेलो होतो मी जप केला. पण मला त्यावेळी प्रमोद महाजनांना हात लावता आला नाही. तिथे जाण्याची कुणाला संमतीच नव्हती. ती मिळाली असती तर मी महाजनांना वाचवू शकलो असतो असा दावा खैरे यांनी केला आहे. प्रमोदजी बारा दिवस जगले, त्यानंतर शांत झाले. त्याच एका कामात मला अपयश आलं नाहीतर मला आत्तापर्यंत अशा प्रयोगांमध्ये एकदाही अपयश आलेलं नाही. जशी डॉक्टरांची शक्ती असते तशी आमची सदिच्छा असते. मी अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगत नाही खरोखरच सांगतो आहे असंही खैरे यांनी सांगतिलं.

अनेकदा मी रूग्णालयांमध्ये जात असतो, कोणाला काही मदत हवी असेल तर मी माझ्या परिने करतो. एका बाईला चालता येत नव्हतं तेव्हा आपण तिला कसं बरं केलं याचाही अनुभव त्यांनी सांगितला. सरकारच्या आरोग्य शिबीरात चंद्रकांत खैरे हे एखाद्या भोंदूबाबा प्रमाणे दावा करत होते आणि उपस्थित त्यांना ऐकत होते. नाडीवर हात ठेवू दिला असता तर मी प्रमोद महाजन यांना वाचवू शकलो असतो असा दावा आता त्यांनी औरंगाबादमध्ये केला आहे.

Story img Loader