गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी एकाच मंचावर हजेरी लावल्यामुळे युतीसंदर्भातील चर्चांनी आणखी जोर धरला. या घडामोडीनंतर प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेबरोबर युती करण्यास तयार आहोत. आमचा काँग्रेसला कधीही विरोध नव्हता, असं विधान केलं आहे. युतीबाबतचा निर्णय आता उद्धव ठाकरे यांनीच घ्यायचा आहे, असंही आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांच्या या विधानानंतर संभाव्य युतीचा निर्णय उद्धव ठाकरे यांनीच घ्यायचा आहे, हे जवळपास निश्चित झालं आहे. पण वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासमहाविकास आघाडीच्या इतर पक्षांचा विरोध होता, अशी चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत सूचक विधान केलं आहे.
हेही वाचा- प्रकाश आंबेडकरांचं शिवसेनेसोबत युतीबाबत मोठं विधान; म्हणाले, “त्या बातम्यांमध्ये तथ्य…!”
प्रकाश आंबेडकरांनी युतीत येण्याचा निर्णय घेतला तर तो दुग्धशर्करा योग असेल, असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. त्यामुळे ठाकरे-आंबेडकर युतीला राष्ट्रवादीने हिरवा कंदील दिला आहे का? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा- बावनकुळेंनी पंकजा मुंडेंना भाषण करू दिलं नाही? भरसभेत नकार दिलेला ‘तो’ VIDEO व्हायरल
ठाकरे-आंबेडकर युतीबाबत विचारलं असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसमधील निर्णय प्रक्रियेतील नेता नाही. पण सामाजिक दृष्टीकोनातून जेव्हा मी राजकारणाकडे पाहतो. तेव्हा मला वाटतं की, प्रकाश आंबेडकरांनी युतीत येण्याचा निर्णय घेतला तर तो दुग्धशर्करा योग असेल. महाराष्ट्रात सध्या धर्मांधता वाढत आहे. जातीय द्वेष वाढत आहे. अशा काळात प्रकाश आंबेडकरांनी समविचारी पक्षांसोबत जातोय, असं म्हटलं तरी ते खूप ताकदीचं ठरेल.”