Lok Sabha Election Result 2024 : देशाच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार आणि कोणाच्या हातात देशाची सूत्रं येणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आतापर्यंत समोर आलेले कल लक्षात घेता राज्यात महाविकास आघाडी महायुतीला मागे टाकून आगेकूच करताना दिसत आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “जनतेला जेवढं समजलं, जेवढी आकलनशक्ती होती. ते जनतेने दाखवलं, काय खरं आणि काय खोटं. सोनं कोणाकडे आहे आणि दगड कोणाकडे आहे, हे जनतेने दाखवून दिले. सगळीकडे हेच झाले. तुम्ही जेवढा सत्तेचा माज दाखवला, तेवढा लोकांनी खाली आणला. लोकांनी गद्दारी करणाऱ्यांना चांगली अद्दल शिकवली, याचा आनंद आहे.”

हेही वाचा : Lok Sabha Election Result : मोदींचं ‘नकली संतान’ विधान भोवलं? उद्धव ठाकरेंची भाजपासमोर कडवी लढत

अठराव्या लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर अजित पवार गट हे महायुतीमधून तर शरद पवार गट हे महाविकास आघाडीतून निवडणूक लढवित आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १९ जागांवर निवडणूक लढविली होती. यापैकी बारामतीमधून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे आणि साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा विजय झाला होता. दोन महिन्यांनी उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील विजयी झाले होते.

यंदा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला महाविकास आघाडीमध्ये केवळ १० जागा मिळू शकल्या. दोन गटात फूट पडल्यानंतर शरद पवारांकडे सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे हे तीन विद्यमान खासदार उरले आहेत. तर अजित पवार गटाकडे सुनील तटकरे हे निवडून गेलेले एकमेव खासदार आहेत. महायुतीमधून निवडणूक लढवित असताना अजित पवार यांना मात्र जागावाटपात फार यश मिळाले नाही. रायगड, शिरूर, बारामती आणि धाराशिव हे चार मतदारसंघ त्यांच्या वाट्याला आले. त्यातही शिरूर आणि धाराशीवमध्ये त्यांना शिंदे गट आणि भाजपामधून उमेदवार आयात करावे लागले.

बारामती आणि शिरूर या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होत आहे. या दोन जागांचा निकाल दोन्ही गटांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.