राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी काही वेळापूर्वीच राजीनामा दिला आहे. प्रदेश सरचिटणीस या पदाचा राजीनामा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. शरद पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारीही शरद पवार यांना विनंती केली होती की तुम्ही तुमचा राजीनामा मागे घ्या. त्यांनी तो राजीनामा अद्याप मागे घेतलेला नाही. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी?

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. त्यानंतर ते म्हणाले, “लोकशाहीत लोकांचं ऐकलं पाहिजे. लोकांचा जो कल आहे त्यानुसार नेत्याने वाटचाल केली पाहिजे. शरद पवारांनी असा निर्णय का घेतला? त्यांनी आम्हाला विश्वासात का घेतलं नाही? आमचं आयुष्य त्यांच्यासाठी काहीच नाही का? जी लढाई आम्हाला लढायची आहे ती आम्ही शरद पवारांना वगळून कशी लढणार? मी आज माझ्या प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. आमच्या पक्षात शरद पवारांनी नव्या लोकांना घ्यावं. आम्हीही राजीनामा दिला आहे नव्या लोकांना संधी द्या. मात्र शरद पवारांनी पद सोडायला नको” असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न झाले. मात्र शरद पवार हे निर्णयावर ठाम होते. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर उपोषणालाही सुरुवात केली. अशात अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या सगळ्यांची समजूत घातली. मंगळवारी संध्याकाळी शरद पवारांनी आपण निर्णयाचा फेरविचार करतो आहोत आणि दोन ते तीन दिवसांचा अवधी द्यावा असा निरोप अजित पवारांकरवी पाठवला. अशात आता जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.

सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये आज चर्चा झाली त्यानंतर सुप्रिया सुळे या राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशा चर्चा रंगल्या आहेत. तसंच अजित पवारांकडे राज्याचं नेतृत्व असेल अशीही चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादीकडून याबाबत अधिकृत रित्या काही सांगण्यात आलेलं नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader jitendra awhad resign from his post and gave this reaction after scj