राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहारी होता असं वक्तव्य केलं. त्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. आता भाजपा नेत्यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांनी हा जावईशोध कुठून लावला असं विचारलं आहे. तसंच महाराष्ट्रातली रामभक्त जनताच आता तुम्हाला धडा शिकवेल असंही राम कदम म्हणाले आहेत.
काय म्हणाले राम कदम?
जितेंद्र आव्हाड म्हणाले राम मांसाहारी होता. त्यांनी हा जावईशोध कुठून लावला? रामाविषयी आमच्या मनात आदर आहे. रामाविषयी प्रत्येक हिंदू माणसाच्या मनात आदर आहे. असं असताना जाणीवपूर्वक आमच्या भावना दुखावण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. हा हिंदू जनभावनेशी खेळ आहे. मला आता प्रश्न आहे की उद्धव ठाकरे कुठे आहेत? ते या सगळ्यावर गप्प का बसले आहेत? शरद पवार गटातल्या लोकांना तुम्ही रामाविषयी असं कसं काय बोलता? हा प्रश्न ते का विचारत नाहीत?
हे पण वाचा- “देव धर्माच्या नावावर राजकारणाचा बाजार…”, जितेंद्र आव्हाडांच्या ‘राम मांसाहारी’ वक्तव्यावर रोहित पवारांची टीका
जे घडतं आहे ते आधीपासूनच ठरेलेलं
राम कदम यांनी हादेखील आरोप केला आहे की, “जे काही घडतं आहे ते आधीपासून ठरलं आहे. काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या विरोधात आहेत. मंदिर उभं राहिल्यानंतर अशा प्रकारची टीका त्यांच्याकडून आणि त्यांच्या गटातल्या नेत्यांकडून होते आहे. आता रामाला मांसाहरी म्हणून त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. राम मांसाहरी नव्हता. कंदमुळं, फळं आणि भाज्या खाऊन त्याने वनवासात उदरनिर्वाह केला. हे सगळं यांना माहीत आहे. तरीही मतपेटीच्या राजकारणातून अशी वक्तव्य करत आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी याबाबत भूमिका घ्यावी अन्यथा महाराष्ट्रातले रामभक्त त्यांना त्यांची जागा दाखवतील.” असं राम कदम यांनी म्हटलं आहे. टाइम्स नाऊने हे वृत्त दिलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलं ?
राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील शिबिरात उपस्थित केला. तसेच शिबिरानंतर माध्यमांनी आव्हाड यांना पुन्हा एकदा या विषयावर बोलते केले. तेव्हा ते म्हणाले, “मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत”, असेही आव्हाड म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन आता भाजपा नेते आक्रमक झाले आहेत.