दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे देशभर खळबळ माजली होती. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी आफताबला फाशी देण्याची मागणी जोर धरते आहे. तसंच, दुसरीकडे लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्यासाठीही मागणी केली जातेय. परंतु, या कायद्याला अनेकांचा विरोध आहे. लव्ह जिहाद धर्मांतर आणि लँड जिहादविरोधी कायदा पूर्ण देशभर लागू करण्याकरता अॅड.निरंजन डावखरे यांनी हिंदू जनजागरण धर्मसभेचे आयोजन केले आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणतात की, “आफताब आणि श्रद्धा वालकर या प्रकरणामध्ये शंभर टक्के आफताबला फाशी झालीच पाहीजे. पण, आफताब या नावाखाली गैरसमज पसरवणाऱ्यांना मला एवढेच सांगायचे आहे की, आफताब हा पारसी आहे. ज्या उद्देशाने त्याचे नाव घेतले जाते, तो उद्देश हिनमनोवृत्ती दाखवणारा आहे. तसेच जर कुठेही लव्ह जिहादसारखी प्रकरणं असतील तर आम्ही तुमच्याबरोबर उभे राहू. “
हेही वाचा >> “ही तर राक्षसी राजवट…” बारसूतील लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी व्यक्त केला संताप
“मला नाही वाटत ठाण्यात एकही प्रकरण लव जिहादचे झाले आहे. शीव, फुले, शाहू, आंबेडकर ह्यांच्या महाराष्ट्रात कुठल्या ही महिला भगिनीला होणारा त्रास कसा काय आम्ही सहन करू. पोलिसांकडे त्याबाबत काही नोंद आहे असे देखील वाटत नाही. असेल तर पोलिसांनी तसे सांगावे. पण, निष्कारण त्यावरुन ठाण्यामध्ये तणाव निर्माण करणं हे काही योग्य आहे असे वाटत नाही, असं आव्हाड म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कुठलेतरी कारण काढून धार्मिक तेढ निर्माण करुन अशांतता पसरवणं ही मानसिक विकृती आहे आणि त्यामध्ये संपूर्ण देशाचे नुकसान होते”, असंही ते म्हणाले.
“ठाण्यात काही पोस्टर्स लागली आहेत. ती पोस्टर्स वाचल्यानंतर असे वाटते की, हिंदू धर्मातील महिला भगिनींना सद्सदविवेक बुद्धीच नाही आणि त्या कधीही जाळ्यात फसू शकतात. मला यामध्ये कुठेही सत्यता वाटत नाही. माझ्या हिंदू भगिनी अत्यंत हुशार आहेत. त्यांची सद्सदविवेक बुद्धी जागृत आहे आणि आपल्या आयुष्याचं पुढे काय करायचं हा निकाल घेण्यासाठी त्या खूप समर्थ आहेत. त्यांच्या सामर्थ्याला कमी लेखू नका आणि ही पुरुषप्रधान संस्कृती त्यांच्यावर लादू नका. जगातील सर्व धर्मातील महिला या शंभर वर्षांपूर्वी कशा होत्या आणि शंभर वर्षांनंतर कशा आहेत हे आपण जाणून आहोत. तेव्हा कुठल्याही वर्णाला, कुठल्याही वर्गाला तसेच स्त्री-पुरुषामध्ये भेदभाव न करता आपण सगळे सामान आहोत आणि बुद्धीजीवी आहोत एवढं लक्षात ठेवा. निरंजन डावखरे यांनी एका मुस्लिम भगिनीशी विवाह केला आहे हे सामंजस्य वाढीला लागावे हीच इच्छा”, असं ते पुढे म्हणाले.
तसंच हा कार्यक्रम नवपाड्यात न घेता डायघर ला का घेतला हे कोडे काही सुटत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.