शिर्डी : पक्ष फुटीनंतर प्रथमच होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अधिवेशन शनिवारी नाराजीनाट्य आणि नेत्यांच्या एकमेकांवरील टीकेने गाजले. मंत्रीपदासाठी डावलल्याने नाराज झालेले पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अधिवेशनास हजेरी लावली. मात्र, या वेळी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य केले. ‘शिबिराचे नावच अजितपर्व ठेवले आहे, यावरून काय ते कळून घ्या, पक्षात एकाधिकारशाही झाली आहे. मी स्पष्ट बोलतो त्याची शिक्षा मला मिळाली’, असा आरोप भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला.

अधिवेशनास सुरुवात झाल्यावर अजित पवार – छगन भुजबळ समोरासमोर आले. मात्र दोघांत कोणतेही संभाषण झाले नाही. भुजबळ यांनी काही वेळ अधिवेशनाच्या सभामंडपात हजेरी लावत नंतर ते बाहेर पडले. या वेळी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी पक्षनेतृत्वावर हल्ला चढवला. सुनील तटकरे यांनी शिबिराला येण्याचा आग्रह केल्याने मी शिबिराला आलो आहे. मी ठाकरेंच्या शिवसेनेतही होतो, तेथेही एकाधिकारशाही होती. मात्र तेथे ११ जणांचे मत विचारात घेतले जायचे. शरद पवारांच्या पक्षातही मी होतो. ते निश्चितच यांच्यापेक्षा मोठे नेते आहेत. तिथे सगळ्यांची मते जाणून घेतल्यानंतरच निर्णय घेतला जायचा. काँग्रेसमध्ये तर संसदीय समितीच निर्णय घेते. आमच्या पक्षात कुणाचाच विचार घेतला जात नसल्याची नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा : Beed Guardian Minister : पालकमंत्री पदाच्या यादीतून पत्ता कट झाल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी स्वतः बीड जिल्ह्याचं…”

धनंजय मुंडे यांची दांडी

पक्षाचे दुसरे चर्चेत असलेले धनंजय मुंडे यांनी पक्षाच्या अधिवेशनाकडे पाठ फिरवली. बीड येथील संतोष देशमुख खून प्रकरणावरून धनंजय मुंडे हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीबद्दल पक्षाकडून काहीही सांगण्यात आले नाही.

हे पक्षाचे शिबीर आहे. हे कोणा एका व्यक्तीचे नाही. आमच्या पक्षात कुणाचाच विचार घेतला जात नाही. -छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस</p>

Story img Loader