राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात २०२३ मध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार हे ४१ आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना महाराष्ट्राने पाहिला. लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे निवडून आल्या. तसंच मविआला चांगलं यश मिळालं. तर विधानसभेत अजित पवारांच्या पक्षाचे ४२ आमदार निवडून आले. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पवार एकत्र येतील अशा चर्चा रंगत आहेत. आता प्रफुल्ल पटेल यांनी एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

विधानसभेनंतर काय चर्चा रंगल्या?

विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही एकत्र येतील अशा चर्चा रंगल्या होत्या. विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ नोव्हेंबरला लागला होता. त्यानंतर १२ डिसेंबरला शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार आणि त्यांच्या पक्षातले लोक दिल्लीत गेले होते. तेव्हापासून या चर्चा रंगल्या आहेत. मात्र हे दोन पक्ष एकत्र आलेले नाहीत. दरम्यान रयत शिक्षण संस्थेबाबत शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली. जानेवारी महिन्यातही यासंदर्भातली काही विधानं झाल्यानंतर चर्चा रंगल्या होत्या. तसंच विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनीही शरद पवारांवर टीका करणं थांबवलेलं दिसून आलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रफुल्ल पटेल यांचं एक विधान समोर आलं आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी काय म्हटलं आहे?

रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातली मोठी संस्था आहेत. लाखो विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत. या संस्थेचे विश्वस्त अजित पवार आहेत आणि शरद पवार हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्या संस्थेच्या कार्यकारिणीच्या दृष्टीने शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर तो काही विषय नाही. बारामतीचा विकास असो, महाराष्ट्राचा विकास असो याबाबत जर शरद पवारांशी संवाद झाला असेल तर त्यात काही चुकीचं नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी जर दोघे एकत्र येत असतील तर त्यात चुकीचं नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी दिली.

अमित शाह यांच्याकडे कुठलीही तक्रार आम्ही केली नाही- प्रफुल्ल पटेल

आम्ही अमित शाह यांच्याकडे कुठलीही तक्रार केली नाही, खंत व्यक्त केली नाही. महायुतीचे सगळे नेते हजर होते. खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही भेटलो. महाराष्ट्रात महायुती भक्कमपणे चालवायची कशी याबाबतच आम्ही चिंतन केलं असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.