मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर दहीहंडी पथकातील गोविंदांना शासकीय नोकऱ्यांमध्ये खेळाडू कोट्यातून पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर अनेक राजकीय नेत्यांकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. “मुख्यमंत्र्यांनी भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात” असा टोला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे.
यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर शंका उपस्थित केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची दहीहंडी फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बुलेट ट्रेनच्या वेगानं हा निर्णय घेतला आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
हेही वाचा- “एकनाथ शिंदेंनी चोरून दहीहंडी फोडली” जयंत पाटलांचा खोचक टोला, म्हणाले…
रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “दहीहंडी पथकातील गोविंदाना खेळाडू कोट्यातून ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय बुलेट ट्रेनच्या वेगानं घेतला आहे. हा निर्णय आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच घेतला असावा, अशी दाट शंका येते. याबाबत अनेक विद्यार्थी आणि खेळाडूंनी फोन करुन त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवल्याचंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
अन्य एक ट्वीट करत त्यांनी म्हटलं की, “राज्य सरकारच्या या निर्णयाला आमचा विरोध नाही. मात्र, कुठलाही निर्णय व्यापक विचारानंतर घ्यायला हवा. एवढ्याच सुपर फास्ट गतीने निर्णय घ्यायचे असतील तर खेळाडूंच्या नियुक्त्या, नोकरभरती यासंदर्भातील निर्णय घ्यावेत. पण युवकांच्या भविष्याशी निगडीत विषयांबाबत राजकारण होऊ नये, ही अपेक्षा.”