अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना गोविंदगिरी महाराज यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करून त्यांच्या त्याग आणि समर्पण वृत्तीचे दाखले दिले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. यावेळी त्यांनी एक ऐतिहासिक आठवण सांगितली होती, ज्यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. इतिहासाचे चुकीचे दाखले देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
काय म्हणाले रोहित पवार?
गोविंदगिरी महाराज यांच्या भाषणानंतर रोहित पवार यांनी एक्सवर आपली भूमिका मांडणारी पोस्ट केली. त्यात ते म्हणाले, “आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही.”
पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना; गोविंदगिरी महाराज म्हणाले, “श्रीमंत योगी…”
“छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होतेच, पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही. त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजेच स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्व दिलं. शिवरायांचं स्वराज्य म्हणजेच रयतेचं राज्य हे रामराज्याला साजेसं असं सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवणारं होतं. शेतकरी, बारा बलुतेदार संपन्न होते, महिला-भगिनी सुरक्षित होत्या, द्वेषाला कुठलीही जागा नव्हती आणि या स्वराज्याची प्रेरणा व मार्गदर्शक केवळ आणि केवळ माँसाहेब जिजाऊ आणि सर्वसामान्य रयत होती. त्यामुळे आपली वक्तव्ये आपण त्वरित मागे घ्यावीत, ही विनंती!”, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.
राम मंदिर बांधून झालं आता पुढे काय? पंतप्रधान मोदी म्हणाले…
गोविंदगिरी महाराज काय म्हणाले होते?
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन दिवसांचा उपवास करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी ११ दिवसांचा उपवास ठेवला, असे सांगून गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली. हे करत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले. “आज या ठिकाणी मला एका राजाची आठवण होत आहे, ज्यात हे सर्व गुण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लोकांना कदाचित माहीत नाही, छत्रपती शिवाजी महाराज स्वतः मल्लिकार्जूनाच्या दर्शनासाठी श्री शैलम येथे गेले होते. तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला. ते तीन दिवस शिवमंदिरात राहिले. त्यावेळी दर्शन घेतल्यानंतर महाराजांनी सांगितले की, मला आता राज्य करायचे नाही. मला भगवान शिवाची सेवा करायची आहे. पण महाराजांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी महाराजांची समजूत घातली आणि राज्य करणे ही देवाची सेवाच आहे, असे सांगितले.”
आज मला समर्थ रामदास स्वामीचींही आठवण होत आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन करताना म्हटले, “निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू… श्रीमंत योगी, श्रीमंत योगी”. आज आपल्याला पंतप्रधान नरेंद्र यांच्या रुपाने असाच एक श्रीमंत योगी प्राप्त झाला आहे, अशी भावना गोविंदगिरी महाराजांनी व्यक्त केली.