गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, एकनाथ खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेल्याचीही चर्चा आहे. सुमारे तीन तास अमित शाहांच्या कार्यालयाबाहेर बसल्यानंतर शाहांनी खडसेंची भेट नाकारली असा गौप्यस्फोट भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. यावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
या सर्व घडामोडींदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे आणि अमित शाह यांच्या भेटीबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाबाहेर एकनाथ खडसे प्रतीक्षा करत बसले होते, याची काही माहिती तुमच्याकडे असेल तर आम्हालाही द्या. केवळ चर्चांवरच आपण बातम्या करणार असू आणि चर्चेवरच राजकारण करणार असू तर यातून कुणालाही काही मिळणार नाही, जेव्हा हे घडेल तेव्हा त्यावर बोलता येईल” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. ते अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- “बारामतीचा शरद पवार नावाचा माणूस…” एकेरी उल्लेख करत गोपीचंद पडळकरांची जोरदार टीका!
पुढे रोहित पवार म्हणाले, सध्या राज्यात चर्चेला अनेक गोष्टी आहेत. पण त्यांच्या जिल्ह्यात दोन शक्तीस्थान असल्यामुळे कदाचित लोकांचं मन विचलित व्हावं, यासाठी महाजनांनी संबंधित वक्तव्य केलं असेल. त्यामध्ये काही तथ्यही नसेल. त्यामुळे उगीच ज्या गोष्टी खऱ्या नाहीत, त्यावर वेळ कशाला घालवायचा, असंही पवार म्हणाले.
हेही वाचा- खडसेंना तीन तास ऑफिसबाहेर बसवून अमित शाहांनी भेट नाकारली? गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ खडसे भाजपात जाणार आहेत, अशी चर्चा आहे, यावर तुमचं मत काय? असा प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले, “आहो, ती चर्चाच आहे ना… आणि चर्चाच राहणार आहे. चर्चांवर राजकारण आणि बातम्या करता करता आपण सगळेजण थकून जाऊ इतक्या चर्चा आज महाराष्ट्रात होत आहेत. त्यामुळे अशा चर्चांवर वेळ न घालवता, जेव्हा खरी गोष्टी समोर येईल, तेव्हा आपण यावर वक्तव्य करू”, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे.