Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला, तर महायुतीला मोठं यश मिळालं. या निवडणुकीत महायुतीने तब्बल २०० पेक्षा जास्त जागा मिळवल्या. त्यामुळे आता राज्यात महायुतीचं सरकार पुढच्या काही दिवसांत स्थापन होईल. सरकार स्थापन करण्यासाठी सध्या महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. यासाठी आता दिल्लीत उद्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशा तिन्ही नेत्यांची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीच्या सरकारचा फॉर्म्युला ठरणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएमबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तसेच महायुतीवर हल्लाबोल करण्यात येत आहे, तर त्यांच्या टीकेला महायुतीमधील नेत्यांकडून प्रत्युत्तरही देण्यात येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली. “फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्टर सुप्रिया सुळे आहेत”, अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा : ‘माय पार्टी अँड माय फादर’ म्हणत पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना खडसावलं; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय?

रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?

“फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्टर सुप्रिया सुळे, आमची महायुती मजबूत आहे आणि सरकार स्थापनेची काळजी तुम्ही करू नका. जेवढे निवडून आलेत तेवढे व्यवस्थित सांभाळा. जनतेने तुम्हाला का नाकारले? यावर चिंतन करा. कारण सध्या तुमच असं झालंय सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही”, असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली आहे.