खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी रुपाली चाकणकर इच्छूक आहेत, असे संकेत त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले. मात्र त्या जागेसाठी नाना पाटेकर इच्छूक असल्याची चर्चा होत आहे. याबाबत प्रश्न विचारला असता चाकणकर म्हणाल्या, “निवडणूक ही एकप्रकारची स्पर्धाच आहे. ज्यांना ज्यांना इच्छा आहे, ते उभे राहतात, आपले नशीब अजमावतात. त्यामुळे निवडणूक लढविण्याचा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. शेवटी निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलाच पाहीजे, त्याशिवाय निवडणुका लढण्यात मजा नाही. त्यामुळे मीच निवडणूक लढविणार असे होणार नाही. प्रतिस्पर्धी असले पाहीजेत.”
नाना पाटेकर यांच्या विरोधात तुल्यबळ लढत होईल का? असाही प्रश्न विचारला असता चाकणकर म्हणाल्या, “आजवर अनेक अभिनेते राजकारणात आले. त्यांना लोकांनी किती स्वीकारले किंवा नाही स्वीकारले, हे सर्वांना माहितच नाही. त्यामुळे पुढे पाहू काय होते.”
हे वाचा >> नाना पाटेकर खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढविणार का? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर…
नाना पाटकेर यांच्या उमेदवारीबाबतचा प्रश्न काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार यांनाही अमरावती येथे पत्रकारांनी विचारला होता. त्यावर शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिले. ते म्हणाले, “खडकवासला मतदारसंघ माझ्या घराजवळ आहे. नाना पाटेकर माझे मित्र आहेत. त्यांनी खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे का? हे मी अजिबात ऐकलेले नाही.”
मात्र नाना पाटेकर यांनी स्वतःहून जाहीरपणे खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत अद्याप भाष्य केलेले नाही. सिंहगड येथे नाना पाटेकर यांचे फार्महाऊस आहे. त्यामुळे ते बराच काळ खडकवासला मतदारसंघात मुक्कामी असतात. त्यामुळे या मतदारसंघाशी त्यांचे नाव जोडण्यात आल्याचे कळते.
हे ही वाचा >> नाना पाटेकरांचं खरं नाव माहितीये का? रायगडमध्ये जन्मलेल्या नानांची कौटुंबीक व शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून थक्क व्हाल
त्या दोघांचा विजय अजित पवारांमुळेच
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे हे सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना चाकणकर म्हणाल्या की, “अजित पवार यांच्याविरोधात सध्या दोन खासदार बोलत आहेत, त्यांना अजित पवारांनीच निवडून आणलेले होते. त्यांच्या आक्रोष मोर्चाच्या अफाट आणि विराट सभा पाहिल्या तर तिथे रिकाम्या खुर्च्यांशिवाय काहीही दिसत नव्हते. भावनिक राजकारण आता संपलेले आहे.”
“महाराष्ट्राला आता विकासाचे राजकारण हवे आहे. काहींनी म्हटले की, आता दहा महिने मतदारसंघात तळ ठोकावा लागणार आहे. याचाच अर्थ यापूर्वी अजित पवार होते म्हणून फक्त मतदानाच्या दिवशी आणि निकालाच्या दिवशी यावे लागत होते. अजित पवार नाहीत म्हणून आता दहा महिने तळ ठोकावा लागत आहे. अजित पवारांवर बोलल्याशिवाय यांची बातमी होणार नाही, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवारांवर बोलण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन काम करावे”, असा टोला रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.