गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेत्या सुषमा अंधारे यांच्यात संघर्ष सुरु आहे. सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटलांच्या मतदासंघात ‘महाप्रबोधन यात्रा’ आयोजित केली होती. मात्र, पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली होती. त्यानंतर अंधारेंनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत ‘दबावतंत्राचा’ वापर केल्याचा आरोप पाटलांवर लावला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आरोपांना उत्तर देताना गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली होती. त्यांनी सुषमा अंधारेंचा उल्लेख ‘नटी’ असा केला आहे. “सुषमा अंधारेंना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा पिक्चर ( चित्रपट ) कुठेच चालला नाही, त्यामुळे त्या शिवसेनेत आल्या. ठाकरे गटालाही नटीची गरज होती. ज्याप्रमाणे एखादा पिक्चर काढण्यासाठी अभिनेत्रीची गरज असते, त्याप्रमाणे यांनाही ( ठाकरे गटाला ) एखादी बाई पाहिजे होती,” असे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : संदीप पाटलांना MCA अध्यक्षपदासाठी शरद पवारांनी उमेदवारी दिली होती?; आशिष शेलार म्हणाले, “हा…”

“खोट्या चौकश्या करून पुरुषांना संपवलं जात आहे, त्या पद्धतीने…”

यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी गुलाबराव पाटील यांचा समाचार घेतला आहे. “महाराष्ट्रातील राजकारणाच्या संस्कृतीचे ईडी सरकारकडून धिंडवडे काढले जात असून, याचा प्रत्यय सातत्याने येत आहे. सुषमा अंधारेंचं भाषण आवडत नाही म्हणून ते करुन द्यायचं नाही. पोलिसांचा दबाव टाकयाचा. त्यानंतर जवाबदार पदावर असताना महिलांविषयी ही भाषा वापरायची आणि मग माफी मागायची. खोट्या चौकश्या करून पुरुषांना संपवलं जात आहे. त्या पद्धतीने ईडी सरकारला महिलांना राजकारणातून संपवायचं आहे का?,” असा सवाल रुपाली पाटील यांनी विचारला आहे.

“आपली पात्रता नाही”

“आता आम्ही सुद्धा पातळी सोडून बोलणार आहे. गुलाबरावांनी डुकारासारखे तोंड घेऊन वचावचा बोलू नये. आपली पात्रता नाही आहे. सुषमा अंधारेंना ‘नटी’ म्हणत असचाल, तर तुमच्या घरातील ‘नट्या’ बाहेर आणा. त्यांना सुषमा अंधारेंच्या विरोधात मैदानात उतरण्यास सांगा,” असे आव्हान रुपाली पाटील यांनी दिलं आहे.

हेही वाचा : ‘काँग्रेसचे दोन टप्पे पडतील’ म्हणणाऱ्या आशिष शेलारांना यशोमती ठाकूरांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या, “आरएसएस…”

“४० आमदार आणि सरकार विरोधकांचा…”

“पन्नास ‘खोके’ घेतल्याने बोके माजले आहेत. या आमदारांनी शिवसेना फोडण्यासाठी भाजपाकडून ‘खोके’ घेतल्याचं शेंबडी पोर सुद्धा बोलत आहेत. लग्नात गेलं की किती ‘खोके’ घेतल्याचं विचारतात, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. खोके घेणारे सुषमा अंधारेंना खोके घेतल्याचं विचारत आहेत. ४० आमदार आणि सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी कुरघोडी करत आहेत. त्याला सुषमा अंधारे पुरुन उरल्या आहेत,” असेही रुपाली पाटील-ठोंबरे यांनी म्हटलं. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader rupali patil thombare attacks gulabrao patil over sushma andhare actor statement ssa