भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडू, याची सुरुवात बारामतीतून करावी लागेल, अशा आशयाचं विधान केलं होतं. या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी बावनकुळे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडणं, हे कुणाच्या बापाची जहागिरी नाही. तुम्हाला या जन्मात नव्हे तर पुढच्या सात जन्मातही घड्याळ बंद पाडणं शक्य नाही, अशी टीका रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. हिटलरशाही आणि दबाब यंत्रणांचा आधार न घेता मैदानात या, राज्यातील जनता भाजपाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही ठोंबरे पाटील यांनी केली आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ही टीका केली आहे.

हेही वाचा- VIDEO: यूपीतील योगी सरकारच्या कारभारावर भाजपा खासदाराचं मोठं विधान, म्हणाले “तोंड उघडलं तर…”

संबंधित व्हिडीओत रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, “भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेभाऊ, आपण जी वक्तव्य करत आहात की, राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते की, राष्ट्रवादीचं घड्याळ थांबवणं किंवा बंद पाडणं हे कुणाच्याच बापाची जहागिरी नाही. हिटलरशाहीने आणि यंत्रणेचा दबाव आणून तुम्ही आमच्यातील काही लोक फोडून सत्तेवर आला आहात, म्हणून तुमचा आत्मविश्वास वाढला आहे. पण सगळेच गद्दार नसतात, हे नीट लक्षात ठेवा.”

हेही वाचा- राज ठाकरेंनंतर काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट? ‘वर्षा’वर राजकीय हालचालींना वेग

“सगळेच हिटलरशाहीच्या दबावाला बळी पडणारे नसतात. काहीजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळासारखे खंबीर कार्यकर्ते आणि नेतृत्व करणारे मावळेही असतात. त्यामुळे तुम्हाला या जन्मात आणि पुढच्या सात जन्मातही घड्याळ बंद पाडणं शक्य नाही. याउलट तुम्ही हिटलरशाही, दबंगगिरी आणि यंत्रणेद्वारे दबाव आणणं बंद करून मैदानात या… नक्कीच जनता भाजपाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सांगते, राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडणं, ही कुणाच्याच बापाची जहागिरी नाही. तुम्ही कधीही घड्याळ बंद पाडू शकत नाही. यामध्ये तुमचाच नायनाट होईल, एवढं लक्षात असू द्या” अशा शब्दांत रुपाली ठोंबरे पाटील यांनी बावनकुळे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader rupali thombare patil on bjp leader chandrashekhar bawankule rmm