गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे बंडखोरी प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. एकनाथ शिंदे यांना ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आहे.

याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी साडेसहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. याबाबतची माहिती अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बोललं जात आहे.

माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं की, ” आज सायंकाळी साडेसहा वाजता शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि मी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. सध्याच्या राजकीय घडामोडीवर मुख्यमंत्र्यांचं मत काय आहे? याबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत,” असंही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा- एकनाथ शिंदे गुवाहाटीहून मुंबईला रवाना? राजकीय नाट्याला वेगळं वळण

शिवसेनेच्या ४० बंडोखर आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपाबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, “गेली अडीच वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन सरकार चालवलं. देशपातळीवर वेगवेगळ्या राज्यांच्या टॉप मुख्यमंत्र्यांची यादी जारी केली जायची, त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिसऱ्या, चौथ्या किंवा पाचव्या स्थानी कायम असायचे. ते क्रमांक आम्ही देत नव्हतो. देशपातळीवरची जी कोणती संस्था असेल ती याबाबत चर्चा करायची, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचं काम चांगलं होतं.”

“महाराष्ट्रावर करोना सारखं एवढं मोठं संकट आलं होतं. हे संकट जागतिक पातळीवरचं होतं. यातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी जे काही कार्यक्रम घेतले गेले, ते अतिशय व्यवस्थितपणे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राबवले गेले,” असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

Story img Loader