मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. जितेंद्र आव्हाडांवर ७२ तासांच्या आतमध्ये दोन गंभीर गुन्हे दाखल झाले होते. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील चित्रपटगृहात सुरू असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडल्याप्रकरणी आव्हाडांवर पहिला, तर ७२ तासांच्या आत आव्हाडांवर विनयभंगाचाही गुन्हा दाखल झाला होता. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करत शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे.
शरद पवार यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्हांबाबत विचारले असता पवार यांनी सांगितलं, “लोकप्रतिनिधीच्या कामात अडथळा आणून, त्याला नाउमेदक केलं जात आहे. सत्तेचा गैरवापर करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या सगळ्याला जितेंद्र आव्हाड कधी बळी पडणार नाही. आपल्या विचाराच्या लढ्याला आव्हाड तडजोड करणार नाहीत,” असे शरद पवार म्हणाले.
तसचे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “राज्यपाल ही एक संस्था आहे. त्याच्या काही मर्यादा आणि बंधन अशतात. पण, छत्रपतींचा उल्लेख करताना त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्यात. त्या प्रकरणानंतर त्यांचं छत्रपतींबद्दल (चांगलं) बोलल्याचं स्टेटमेंट आलं. सगळ्या प्रतिक्रियांनंतर केलेलं हे विधान म्हणजे उशीराचं शहाणपण आहे,” असे शरद पवार यांनी म्हटलं.