लोकशाही आणि स्वातंत्र्यांची गळचेपी करीत देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल होत आहे. हे रोखण्यासाठी राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी ( २३ जानेवारी ) केली. मात्र, अद्यापही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वंचित आघाडीबरोबर जाण्याबद्दल आपली भूमिका जाहीर केली नाही. अशातच प्रकाश आंबेडकरांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार आजही भाजपाबरोबर असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एबीपी माझा’शी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं,” असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.

हेही वाचा : नागपूर पोलिसांचा धीरेंद्र महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार, श्याम मानव म्हणाले, “आता…”

“सेनेने काही तरी करुन सत्ता आपल्या हातात ठेवली असती, तर…”

२०१९ नंतर शरद पवारांनी भाजपाविरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, असं विचारलं असता प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं, “के सी आर यांनी सुद्धा हा प्रयोग केला. त्यामध्ये शरद पवार नव्हते. शिवसेनेला भाजपाला सोडून बाहेर पडायचं होतं. सेनेने काही तरी करुन सत्ता आपल्या हातात ठेवली असती, तर सरकार पडलं नसतं. पण, सत्तेची गरज काँग्रेस-राष्ट्रवादीला होती, शिवसेनेला नाही,” असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केला.

हेही वाचा : संघ, भाजपाच्या विचारधारेवर बोलताना प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले; “मला भाजपासोबत जायचे असेल तर..”

“शरद पवारांशी जुना वाद”

शिवसेना-वंचित आघाडीच्या युतीबद्दल शरद पवारांना विचारण्यात आलं होतं. त्यावर “मला काही माहिती नाही, मी या भानगडीत पडत नाही,” असं शरद पवार म्हणाले. याबद्दल प्रकाश आंबेडकरांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं, “शरद पवार यांच्याशी माझं जुनं भांडण आहे. पुढील काळात जुने सर्व काही विसरुन पवार आमच्याबरोबर येतील, अशी मला आशा आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader sharad pawar together with bjp say banchit bahujan aghadi leader prakash ambedkar ssa