गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंही एकाच मंचावर होते. एकीकडे शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी काल घेतलेली शरद पवारांची भेट आणि दुसऱ्या दिवशी एकाच मंचावर फडणवीस आणि शरद पवार एकत्र येणं हा राजकीय योगायोगच म्हणावा लागेल. आज शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक किस्सा सांगितला. तसंच या संपूर्ण प्रदेशाला माणदेश म्हटलं जात असे असंही म्हटलं आहे.
काही लोकांना माहित नसेल, इथल्या लोकांना एक वेगळी दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. खरं म्हणजे हा सगळा प्रदेश माणदेश म्हणून ओळखला जात होता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात जास्ती जास्त लोकांनी भाग घेतला होता. त्यात माणदेशातले लोक मोठ्या प्रमाणावर होते. फळबाग आणि उत्तम शेती पाणी नसतानाही करुन दाखवली. आजही मी देशाच्या कानाकोपऱ्यात जातो. केरळ, उत्तर प्रदेश या ठिकाणी गेलो तर तिथे शे-पाचशे लोक एकत्र येतात आणि ते सांगतात की आम्ही महाराष्ट्रातल्या या भागातून आलो. कुणी सोनं घडवण्याचं काम करतं, कुणी आणखी काही काम करतात. इथे दुष्काळ आहे म्हणून लाचारीने जगायचं नाही. जिथे घाम गाळायची संधी असेल तिथे जायचं आणि कष्ट करुन जगायचं हे माणदेशाचं वैशिष्ट्य आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासह आहेत. त्यांना एक गोष्ट माहित नसेल. एके काळी या भागात सर्कस होती. आपल्या देशातली पहिली सर्कस माणदेशातून आली. माणदेशातून त्या सर्कशीमधून देशाच्या कानाकोपऱ्यात लोकांनी प्रयोग केले. एक दिवस दिल्लीत सर्कस आली. मी केंद्रात मंत्री होते तेव्हा सकाळीच काही लोक माझ्याकडे भेटायला आले होते. मी त्यांची चौकशी केली त्यांना विचारलं कुठून आलात? कुणी म्हटलं मी आटपाडीहून आलो, कुणी म्हटलं जवळच्या गावातून आलो. सर्कस घेऊन आलो आहोत. आम्ही सर्कशीत काम करतो. कधी या झोक्यावरुन त्या झोक्यावर उड्या मारतो, कधी हत्ती सांभाळतो, कधी वाघाच्या जबड्यात हात घालतो. या सगळ्या गोष्टी आम्ही सर्कशीत करतो असं मला या सगळ्यांनी सांगितलं अशीही आठवण शरद पवार यांनी सांगितली. मी त्यांना विचारलं की हे कसं काय करता? त्यावेळी ते मला म्हणाले की दुष्काळ आमच्याकडे कायमच आहे. मात्र आम्हाला लाचारीची सवय नाही. वेळ आली तर वाघाच्या जबड्यात हात घालू पण सन्मानाने जगू असं त्यांनी मला त्यांनी म्हटलं आहे. गाजलेल्या सर्कशी त्या वेळी या काळातून होत असत.
वेगळ्या प्रकारचं समाजकारण, राजकारण करण्याची संधी तुम्ही लोकांनी गणपतराव देशमुखांना दिलीत याचा मला आनंद होतो आहे. त्यांच्या पुढच्या पिढीलाही असंच बळ द्या असंही आवाहन शरद पवार यांनी यावेळी केलं.