टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारासा सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाल्याचं समजत आहे. अपघातात दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत म्हटलं की, “माझा भाऊ सायरस मिस्त्रीचा मृत्यू झाला. अजूनही विश्वास बसत नाहीये. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो…”
कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबीयांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
हेही वाचा- टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन, पालघरमध्ये अपघातात गमावला जीव
उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्याची धक्कादायक बातमी ऐकून खूप दु:ख झालं. ते एक चांगले मित्र होता आणि सभ्य व्यक्ती होते. जागतिक बांधकाम क्षेत्रातील बडी कंपनी शापूरजी पालोनजी उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी टाटा समूहाचंही नेतृत्व केलं आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्वीट करत दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचं महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी ऐकून खूप दुःख झालं. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती.