मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. बंडखोर शिवसेना आमदारांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडून अनेक बैठका घेतल्या जात आहेत. त्यांच्याकडून काय रणनीती आखली जातीये, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारलं असता, भाजपाला बैठका घेण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “भाजपाला बैठका घ्यायचा अधिकार आहे. आमचं दडपशाहीचं सरकार नव्हतं आणि कधी असणारही नाही. त्यामुळे भाजपाला त्यांच्या बैठका घ्यायच्या असतील तर तो त्यांचा अधिकार आहे.” महाराष्ट्रातील सत्तासंघर्षादरम्यान सुप्रिया सुळे यांनी असं विधान केल्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीसह विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, “मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरेंसारखाच असावा. त्यांनी आज आपल्या ज्या भावना बोलून दाखवल्या आहेत. त्यात मनाचा मोठेपणा आहे. मला आज आवर्जून बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते. त्यांनी हयात असताना उत्तराधिकारी म्हणून खूप मोठी जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर दिली. आज उद्धव ठाकरे खूप प्रेमाच्या, विश्वासाच्या नात्याने आवाहन करत आहेत. राजकारणात यश- अपयश, उतार-चढाव येत असतात, शेवटी माणसं आणि त्यांच्या नात्यातील ओलावाचं आयुष्यभर टिकतो,” असंही त्या म्हणाल्या.
शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार टिकेल का? असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी काही ज्योतिषी वगैरे नाहीये, पण मला असं वाटतंय की, कुठल्याही कुंटुबात भांड्याला भांडं लागलं किंवा मुलगा-मुलगी रुसून गेली तर आई-वडील सगळं पोटात घेऊन तो प्रश्न सोडवतात. त्यामुळे बंडोखर आमदारांचं जे काही म्हणणं आहे, त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडायला हवा, चर्चेतून मार्ग निघतो. ‘दुनिया उमीद पे कायम है’ असं म्हणत महाविकास आघाडी सरकार टिकेल,” असा आशावाद सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.