मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या आहेत. याबाबतच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
जेव्हा जेव्हा टीव्ही बघते, तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाच्या तरी घरी दिसतात. विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसतात, सरकारी कामाच्या फारशा बातम्या दिसत नाहीत, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.
हेही वाचा- “आधी बेशरमपणा करायचा आणि नंतर…” आदित्य ठाकरेंचा छत्रपतींसोबतचा फोटो पाहून अतुल भातखळकरांचा संताप
महाराष्ट्रात साम-दाम-दंड भेदचा वापर करून आणि ५० खोके सर्व काही ओके करून हे सरकार ओरबडून आणलं. पण मागील अडीच महिन्यात काहीही काम झालं नाही. मुख्यमंत्री केवळ घरगुती दौरे करत आहेत. ज्या उत्साहाने त्यांनी राज्यातील सरकार पाडलं, त्याच उत्साहाने ते कामं करताना दिसत नाहीत. एकनाथ शिंदे यांचे दौरे केवळ एक किलोमीटरच्या आतले असतात. जेव्हा जेव्हा टीव्ही सुरू करते, तेव्हा तेव्हा ते कुणाच्या तरी घरी भेटीगाठी घेण्यासाठी आलेले दिसतात, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे रविवारी पुण्यात आल्या होत्या, यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्याच्या सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागत आहे. पण त्यांच्याकडून वेळ दिला जात नाहीये. त्यांना सर्वसामान्य लोकांची सेवा करायची नसेल. ते नेहमी कुणाच्या तरी घरी दिसतात. ते केवळ एक किलोमीटरच्या आतील दौरे करत आहेत. मागील अडीच महिन्यापासून राज्यात पालकमंत्री नाहीत. त्यामुळे लोकांनी तक्रार कुठे करायची? हेच कळत नाही, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.