ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. आव्हाडांना अचानक अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आव्हाडांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखादी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी चुकीचं दाखवते, याला विरोध केल्यामुळे जितेंद्र आव्हाडांना अटक होत असेल, तर मी या अटकेचं मनापासून स्वागत करते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीआहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
जितेंद्र आव्हाडांच्या अटकेबाबत प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जो चूक करतो, त्याला पूर्णपणे माफी मिळते आणि जो एखादं आंदोलन करतो, त्याला शिक्षा दिली जाते. यातून मला ब्रिटीश राजवटीचे दिवस आठवले. जितेंद्र आव्हाड हे एक लढवय्ये नेते आहेत. त्यांना प्रश्न विचारण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं. पोलीस ठाण्यात गेल्यावर कळालं की, पोलिसांवर वरून दबाव येतोय. पण आता वरून दबाव येतोय म्हणजे कुठून दबाव येतोय? याचं उत्तर माझ्याकडे नाही.”
हेही वाचा- अजित पवारांच्या नाराजीमुळे सत्तेची समीकरणं बदलणार? बावनकुळे म्हणाले “ते केव्हा बाहेर येतील आणि…”
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “अटकेसाठी दबाव आणल्याबाबत मी कुणावरही आरोप करत नाही. कारण वरून दबाव येतोय म्हणजे यामध्ये बिचाऱ्या पोलिसांची काहीही चूक नाही. महाराष्ट्राच्या पोलिसांना कुणाचे फोन येत असतील आणि याबाबत चर्चा होत असेल, तर वरून दबाव येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. असंच एकंदरीत या सर्व घटनेतून दिसत आहे.”
हेही वाचा- मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक
“एखादा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात काहीतरी चुकीचं दाखवत असेल आणि दुसरी व्यक्ती त्याविरोधात आपल्या वेदना मांडत असेल, यामुळे जर आव्हाडांना अटक होत असेल तर मी या अटकेचं मनापासून स्वागत करते. त्या कामासाठी आम्हाला सर्वांनाही तुरुंगात जावं लागलं तरी चालेल… कारण छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही. या कामासाठी जितेंद्र आव्हाड तुरुंगात जात असतील, तर जितेंद्र आव्हाडांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे सरकारने उत्तर दिलं पाहिजे की, तुम्ही नक्की कुणाच्या बाजुने आहात? तुम्ही छत्रपतींच्या विरोधात असाल तर तसं स्पष्ट करा, मग ही लढाई पूर्ण ताकदीने लढू”असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.