“महाराष्ट्रातील गृहखात्याचे अपयश ही अतिशय गंभीर बाब आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सातत्याने ढासळत आहे. याचा परिणाम म्हणून सातत्याने काहींना लक्ष्य करुन त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत”, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवर गृहखात्याबाबत प्रश्न उपस्थित करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> “मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले नकोत”, नारायण राणेंच्या वक्तव्यावर जरांगेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “कोणावर जबरदस्ती…”

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “नुकत्याच घडलेल्या काही हिंसक घटना आणि टिटवाळा, कल्याण येथे पास्टर जोस यांच्यावर झालेला हल्ला याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतरांवर होणारे वाढते हल्ले ही अतिशय काळजीची बाब आहे. “

“अंतरवली, जालना येथे मराठा आंदोलकांवर केलेला लाठीहल्ला आणि पुसेसावळी, ता. खटाव, जि. सातारा येथील दंगल असो या घटना गृहखात्याचे अपयश अधोरेखित करीत आहेत. नागरीकांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी गृहमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून आवश्यक ती पावले उचलणे अतिशय आवश्यक आहे”, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना ही पोस्ट टॅग केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात जातीय हिंसाचार, दगडफेकीच्या घटना वाढल्या आहेत. याविरोधात शासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत, असा सूर सातत्याने विरोधकांकडून आवळला जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader supriya sules tweet on law and order in the state tagged home minister devendra fadnavis sgk