शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मराठा समाज जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगावर आला, तेव्हा अजित पवारांना डेंग्यू झाला, अशी टीका रामदास कदम यांनी केली. रामदास कदम यांच्या टीकेनंतर अजित पवार गट आणि शिंदे गटात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. रामदास कदमांच्या या टीकेला आता अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवार हे रामदास कदमांच्या आकलनाबाहेरचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी जेवढं आकलन आहे, तेवढंच वक्तव्य करावं. नाहीतर डोळ्याला झंडूबाम लावून रडण्याची वेळ येते, असं प्रत्युत्तर सूरज चव्हाण यांनी दिलं आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ही टीका केली आहे.
हेही वाचा- “तक्रार करताना अजित पवार रडले, असं…”, अमित शाहांबरोबरच्या भेटीबाबत काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान
रामदास कदमांना उद्देशून सूरज चव्हाण म्हणाले, “”अजित पवार हे आपल्या आकलनाबाहेरचे नेते आहेत, हे रामदास कदमांनी आधी लक्षात ठेवावं. एखाद्या व्यक्तीच्या आजारपणावर बोलू नये, यातून आपले संस्कार दिसतात. पवार कुटुंब किंवा अजित पवार हे आपल्या आकलनाबाहेरचे विषय आहेत. त्यामुळे आपलं जेवढं आकलन आहे, तेवढंच आपण वक्तव्य करावं. नाहीतर डोळ्याला झंडूबाम लावून रडण्याची वेळ येते.”
हेही वाचा- “मराठा समाज शिंदेंच्या अंगावर आला, तेव्हा दादांना नेमका…”, रामदास कदमांची अजित पवारांवर टीका
रामदास कदम नेमकं काय म्हणाले?
अजित पवार गटाच्या हेतूंबाबत शंका उपस्थित करताना रामदास कदम म्हणाले, “उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार शरद पवारांचे आशीर्वाद घ्यायला गेले, हे आपण समजू शकतो. पण काल दिलीप वळसे पाटीलही पवारांकडे आशीर्वाद घ्यायला गेले. सुनील तटकरेही आशीर्वाद घ्यायला गेले आणि तिथून ते अमित शाहांना भेटायला दिल्लीत गेले. मराठा समाज जेव्हा एकनाथ शिंदेंच्या अंगावर आला, तेव्हा नेमका अजितदादांना डेंग्यू झाला. अजित पवारांचे २० पैकी २० आमदार एकनाथ शिंदे आणि शासनाच्या विरोधात मंत्रालयात आंदोलन करू लागले. त्यांनी मंत्रालयाचं गेट बंद केलं, हेच मला कळत नाही.”