राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची निवड झाली. यावर शिवसेनेनं ( ठाकरे गट ) भाष्य केलं आहे. शरद पवारांनी भाकरी फिरवली नसून आता कोठे चुलीवर टाकली आहे. भाकरी कच्ची राहू नये म्हणून ती फिरवावीच लागते. आधीची भाकरी करपल्याने नवी भाकरी थापली असेल, तर वाट पाहावी लागेल, असं ठाकरे गटाने ‘सामना’तून म्हटलं आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे.
अग्रलेखात काय सांगितलं?
“काही जण शरद पवारांनी ‘भाकरी फिरवली’ असं म्हणत असतील, तर त्यात दम नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय दर्जा गमावला आहे. नागालॅण्डमध्ये त्यांचे चार-पाच आमदार निवडून आलेत. राज्याबाहेर लक्षद्वीप येथे त्यांचा खासदार आहे. केरळ विधानसभेत त्यांचे एक-दोन सदस्य आहेत. बाकी सर्व कारभार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सर्व काही आटोपशीर आहे. मग एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज काय पडली?,” असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
“अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गट भाजपाच्या दगडावर पाय ठेवून…”
“अजित पवार यांना फेररचनेतून वगळलं. त्यामुळे ते दिल्लीतील कार्यक्रमातून निघून गेले वगैरे नेहमीच्या कंड्या पिकविण्यात आल्या. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘खिलाडी’ आहेत. राज्याच्या बाहेर पडून काम करण्याचा त्यांचा पिंड नाही. सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करावे ही आपलीच सूचना होती, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. अजित पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत व त्यांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपाच्या दगडावर पाय ठेवून आहे, असं नेहमीच सांगितलं जातं,” असं ठाकरे गट म्हणाला आहे.
“अजित पवार हे भाजपाच्या तंबूत जाऊन परत आले हा…”
“अडीचेक वर्षापूर्वी त्यांनी फडणवीस यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी केल्याचा हा परिणाम. अजित पवार हे भाजपाच्या तंबूत जाऊन परत आले हा त्यांच्यावर ठपका आहे. हा ठपका कायमचा दूर करण्यासाठी अजित पवारांनाच शर्थ करावी लागेल,” असं सल्ला ठाकरे गटाने दिला आहे.
“तुमची भाकरी आणि चूल…”
याला राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे नेते सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “संजय राऊत यांनी आमच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा तपासण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या पक्षाचा दर्जा काय हे पाहिलं असतं, तर अशी अग्रलेख लिहिण्याची वेळ आली नसती. आमची भाकरी फिरली नाही, हे पाहण्यापेक्षा तुमची भाकरी आणि चूल ज्यांनी पळवून नेली आहे, त्यांच्याकडं लक्ष द्यायला हवं होतं,” असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं.