दिगंबर शिंदे

सांगली : महापालिकेची मुदत संपण्यास अवघे काही दिवसच उरले असताना महापालिकेत अखेरच्या टप्प्यात पक्षांतर्गत मतभेद उफाळून येत आहेत. गेल्या आठवडय़ामध्ये राष्ट्रवादीमधील अजितदादा समर्थक आणि आमदार जयंत पाटील समर्थक नगरसेवकांमध्ये पेच निर्माण झाला होता. यानिमित्ताने एका सदस्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. या प्रकारानंतर दोघांवर निलंबनाची कारवाई झाली. मात्र, अखेरच्या महासभेसाठी ही कारवाई मागे घेऊन दिलजमाईचेही प्रयत्न होत आहेत.

  महापालिकेची मुदत २० ऑगस्ट रोजी समाप्त होत आहे. तत्पूर्वी आपल्या प्रभागाची विकास कामे मार्गी लावण्याचे सदस्यांचे  प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हे प्रयत्न केवळ जनतेचे भले व्हावे यासाठीच असल्याचा गैरसमज सामान्य शहरवासीयांचा कदापि होणार नाही. कारण ठेकेदारीतून स्वकल्याण आणि जमले तर नागरिकांच्या डोळय़ात धूळफेक करण्याची संधी हा आजवरचा इतिहास आहे. कारण सांगलीत रस्त्यांची अवस्था थोडी बरी असताना मिरजेतील रस्ते कशाला म्हणायचे असा प्रश्न पडला आहे. पालकमंत्री सुरेश खाडे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. निधीची कमतरता नसताना रस्त्याची अवस्था अशी का असे विचारले तर प्रशासनाकडे बोट दाखवले जाते. 

महापालिकेत राष्ट्रवादीचे १५ तर काँग्रेसचे २० सदस्य असे संख्याबळ आहे. तर भाजपने अपक्षांना बरोबर घेऊन ४२  चे संख्याबळ करीत सत्ता संपादन केली होती. मात्र, भाजपअंतर्गत मतभेद, मनभेद यामुळे अडीच वर्षे सत्ता राबविल्यानंतर ती टिकवण्यात भाजपला यश मिळाले नाही. भाजपचे फुटीर नगरसेवक घेऊन राष्ट्रवादीने जशी भाजपवर कुरघोडी केली तसा काँग्रेसलाही शह दिला. काँग्रेसचे संख्याबळ जास्त असतानाही राष्ट्रवादीने महापौरपद आपल्याकडे घेतले. अखेरच्या अडीच वर्षांत दोन स्थायी सभापती झाले. मात्र, राष्ट्रवादीने दिलेल्या शब्दाप्रमाणे सभापती निवडीमध्ये काँग्रेसला सहकार्य केले नाही.

दुसऱ्या बाजूला काँग्रेसला सभापतीपद मिळावे यासाठी नेतेमंडळीही फारशी आग्रही राहिली नाहीत. यामुळे सलग पाच वर्षे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या स्वत:कडे राखण्यात भाजप यशस्वी ठरला. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता असताना निधी वाटपावरूनही दोन्ही पक्षाच्या सदस्यांमध्ये असलेले मतभेद वारंवार समोर आले. मात्र, सत्तेच्या अखेरच्या काळात राष्ट्रवादीमध्येच हमरीतुमरीच नाही तर अगदी मारामारीचा प्रसंग घडला. मिरजेतील संगीता हारगे या मागील पंचवार्षिकमध्ये स्थायी सभापती होत्या. यामुळे प्रशासनातील बारकावे त्यांना ज्ञात आहेत. त्यांच्या प्रभागातील एका रस्ते कामाचा प्रस्ताव त्यांनी दिला होता. मात्र, रस्ता करण्यासाठी त्याची मालकी महापालिकेची असणे आवश्यक असल्याचे सांगत काम नाकारण्यात आले. मात्र, याच कामाची निविदा प्रसिद्ध होताच, त्यांनी आक्षेप घेतला. यावर याच प्रभागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रशासनावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचा दबाव असल्यामुळे विकास कामे करीत असताना अडचणी येत असल्याचा गंभीर आरोप केला. यामुळे संतप्त झालेल्या अन्य नगरसेवकांनी माफीची मागणी केली. मात्र, त्यांनी नकार  देताच माजी महापौर आणि पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी मारण्यासाठी धाव घेतली. मात्र, अन्य सदस्यांनी त्यांना अटकाव केला. यामुळे पुढचा दुर्धर प्रसंग टळला असला तरी वाद हातघाईवर येत चालला आहे हे निश्चित. याचबरोबर मजूर पुरवठा करणाऱ्या मक्तेदार कंपनीकडून महिला मजुरांची होत असलेली आर्थिक पिळवणूक चर्चेला आणून नगरसेवक नायकवडी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नही यावेळी दिसून आला. आता २० ऑगस्टपासून प्रशासकीय राजवट सुरू होत आहे.

Story img Loader