मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन तीव्र झालं आहे. आरक्षणासाठी काही ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलनं केली जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यासह काही ठिकाणी मराठा आंदोलक उपोषणाला बसले आहेत. दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी आंदोलकांनी नेत्यांना घेराव घातल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर मराठा आंदोलनाची व्यापकता आता आणखी वाढली आहे. अनेक आमदार, खासदार आणि मंत्रीदेखील आंदोलनं करू लागले आहेत.
महाराष्ट्रातल्या अनेक मराठा आमदारांना मतदारसंघांमधील नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आमदारांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरू केलं आहे. अनेक मराठा आमदार मंगळवारपासून (३१ ऑक्टोबर) मंत्रालयाबाहेर आंदोलन करत आहेत. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद गटातील अनेक आमदार आणि खासदारांनी मंत्रालयाबाहेरच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं.
या आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या मागण्या करणारे पोस्टर्स झळकावले. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, गरीब विद्यार्धी आणि मराठा तरुणांना लाभांपासून वंचित ठेवणाऱ्या शासनाचा धिक्कार असो, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तात्काळ विशेष अधिवेशन बोलवा, अशा घोषणा आणि मागण्या करणारे पोस्टर्स राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी झळकावले.
हे ही वाचा >> “…ते आमदार मराठ्यांचे दोषी मानले जातील”, अजित पवार गटातील आमदाराचं वक्तव्य
विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं : रोहित पवार
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. यासह रोहित पवार यांनी म्हटलं आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्याच विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, या मागणीसाठी विधिमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन आम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धरणे आदोलन करत आहोत. राज्यात मराठा समाजात निर्माण झालेल्या उद्रेकाची दखल घेऊन विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी मान्य करावी आणि तातडीने विशेष अधिवेशन बोलवावं, ही विनंती!