कोल्हापूर, सातारा, माढय़ाच्या खासदारांच्या फेरउमेदवारीस विरोध
दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>
लोकसभा निवडणुकीच्या तयारीला राष्ट्रवादी काँग्रेसने गती दिली असताना उमेदवार निवडीचा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीची भिस्त असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात तर या मुद्दावरून पक्षांतर्गत वादळ घोंघावत आहे. शिव-शाहूंची गादी असलेल्या कोल्हापूर, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदारांना उघडपणे विरोध करण्यात आला आहे.
साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना तर कोल्हापुरात धनंजय महाडिक या विद्यमान खासदारांना लोकसभेची उमेदवारी देऊ नये, असा आक्रमकसूर मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत उमटला. माढा मतदारसंघात विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबरोबरीने सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनीही निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. सातारा आणि कोल्हापुरातील उभय खासदारांना मात्र उमेदवारी मिळण्याचा विश्वास आहे. पण तसे झाल्यास उमेदवारीला विरोध करणारे निवडणूक प्रचारात विरोधात भूमिका घेण्याची शक्यता असल्याने बंडखोरीचा सामना करताना पक्ष नेतृत्वाचा कस लागणार आहे. याचे परिणाम विधानसभा निवडणुकीवरही होऊ शकतात.
राष्ट्रवादीच्या चाचपणीत पश्चिम महाराष्ट्र हा वादग्रस्त ठरला. राष्ट्रवादीची ताकद पश्चिम महाराष्ट्रात अधिक आहे. येथेच निवडणुकीच्या तोंडावर वाद उफाळला असल्याने पक्षाला हा वाद परवडणारा नाही. विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यास थेट बैठकीत विरोध करण्यात आला. उदयनराजे भोसले आणि धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोल्हापूरच्या आखाडय़ात वाद
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्यावेळी मोदीलाट असतानाही लक्षणीय विजय मिळवला होता. अर्थात, महाडिक यांच्या विजयात त्यांच्या प्रतिमा, कामांसह काँग्रेस- राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदार, पक्षाचे पदाधिकारी यांचा मोठा वाटा होता. निकालानंतर मात्र महाडिक यांनी पक्षाच्या वाढीसाठी, संघटन कार्याकडे दुर्लक्ष केल्याची ओरड पक्षातून होऊ लागली. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आदी निवडणुकांवेळी पक्षाचे उमेदवार महाडिक हे आपल्याला मदत करतील, अशी आशा बाळगून होते. पण, त्यांच्याकडून मदत झालीच नाही उलट ते हस्ते – परहस्ते विरोधकांना मदत करत राहिले, असा आक्षेप पक्षातून घेतला जात होता. ते त्यांचे काका महादेवराव महाडिक यांच्या कलाने कार्यरत असतात. त्यांची पावले राष्ट्रवादीपेक्षा भाजप- ताराराणी आघाडीकडे अधिक कशी वळत राहिली याचा पाढा मुंबईतील बैठकीत वाचला गेला.
महाडिक यांना आधीच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विरोध केला आहे. आता त्यांच्याशी सूर न जुळलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी मुंबईत लावलेला विरोधी सूर महाडिक यांना उमेदवारी मिळण्यात अडथळा ठरणारा आहे. कोल्हापूर राष्ट्रवादीत आखाडा रंगला असला तरी धनंजय महाडिक हे मात्र निश्चित आहेत. पक्षाची उमेदवारी आपल्याला मिळणार याबाबत त्यांना खात्री आहे. ‘आगामी लोकसभेची निवडणूक निश्चितपणे लढवणार आहोत’, असे सांगत त्यांनी आपली वाटचाल स्पष्ट केली आहे.
माढा मतदारसंघातही तिढा
माढा लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे इच्छुक आहेत. पण, आता सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनीही उमेदवारीची तयारी चालविल्याने तिढा निर्माण झाला आहे. देशमुख यांच्यामागे मोहिते – पाटील यांच्या विरोधकांची खेळी आहे का, यादृष्टीनेही पाहिले जात आहे. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते – पाटील यांची जन्मशताब्दी शासनाच्या वतीने साजरी केली जात असून यानिमित्ताने पाटील यांची भाजपशी जवळीक वाढली असल्याचे काहींनी पवारांच्या कानावर घातले आहे. माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी, असा एक मतप्रवाह पक्षात आहे. तर, मोहिते – पाटील यांचे पवार यांच्याशी असलेले संबंध पाहता तेच उमेदवारीचे दावेदार होऊ शकतात, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. या तिढय़ात पवार विद्यमानांना पसंती देणार की भाकरी फिरवणार याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
उदयनराजेंची कोंडी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले खासदार उदयनराजे भोसले हे यंदा पुन्हा निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, पक्षातून त्यांना विरोध होत असल्याचे मुंबईतील बैठकीत दिसले. गेल्या आठवडय़ात शरद पवार सातारा येथे असताना आमदारांनीही उदयनराजे यांच्याविषयी तक्रारी केल्या होत्या. तेव्हा, उदयनराजे यांनी आपली उमेदवारी डावलून तर पाहा असा इशारा दिला होता. त्याची सव्याज परफेड पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही केली. त्यांनी उदयनराजे यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीला कडाडून विरोध केला.