नरेंद्र मोदींवरील अपमानकारक वक्तव्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. त्यानंतर बच्चू कडू यांची आमदारकी (विधानसभा सदस्यत्व) रद्द करा, अशी मागणी करणारे बॅनर काल (२५ मार्च) राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुण्यातील पाषाण रोड परिसरात लावले होते. या बॅनरवर लिहिण्यात आलं होतं की, “आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम हे सर्वांना साखेच असतात.” यावर आता बच्चू कडू यांनी उत्तर दिलं आहे.
बच्चू कडू म्हणाले की, “राष्ट्रवादीची बॅनरबाजी ही एकप्रकारची मूर्खता आहे. हे त्यांनी अज्ञानातून केलं आहे. या अज्ञानपणामुळेच त्यांची सत्ता नेहमी जाते आणि भारतीय जनता पार्टी त्याचा फायदा घेते. मुळात मला जी शिक्षा सुनावली आहे ती दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आहे. त्यापैकी एक गुन्हा हा भारतीय दंड विधानाच्या कलम ५०४ अंतर्गत आहे, तर दुसरा भादंवि ३५३ या कलमाअंतर्गत आहे. एकाच गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली असती तर मी अपात्र ठरलो असतो. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा असेल तर उमेदवार अपात्र ठरत नाही.”
बच्चू कडू म्हणाले की, “मुळात नियम काय सांगतो तर एकाच गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा ठोठावली असेल आणि उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली नाही तर उमेदवाराचं सदस्यत्व (आमदारकी, खासदारकी, इत्यादी) रद्द होतं, हे स्पषट आहे.” ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
हे ही वाचा >> “भर सभेत लिपस्टिकचा विषय”, उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी नाशकातल्या महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
बॅनरवर काय लिहिलं होतं?
बच्चू कडूंची आमदारकी रद्द करा, अशी मागणी करणारे बॅनर काल (२५ मार्च) राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुण्यातील पाषाण रोड परिसरात लावले होते. यावर लिहिलेलं की, “आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम हे सर्वांना साखेच असतात.” यासह या बॅनरवर काही पुणेरी टोलेदेखील पाहायला मिळाले.