दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलेल्या खात्यावर निशाणा साधला होता. सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे? असा टोला अजित पवार यांनी नारायण राणे यांना लगावला होता. त्यावर जन आशिर्वाद यात्रेनिमित्त नारायण राणेंनी सिंधुदूर्गात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांना उत्तर दिले होते. आता अजित पवार यांनी पुन्हा केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
सिंधुदूर्गात असलेल्या नारायण राणेंनी “अजित पवार अजून अज्ञान आहेत. आपल्या खात्याचं बघा. अजून मी राष्ट्रवादीकडे अद्याप वळलेलो नाही. आपल्यावरील आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकलं पाहिजे” अशी टीका करत इशारा दिला होता.
त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना यावर भाष्य केलं आहे. “मला या गोष्टीची जास्त चर्चाच करायची नाही. त्यांच त्यांना लखलाभ. आम्हाला आमचं सरकार व्यवस्थितपणे चालवायचं आहे ते आम्ही चालवत आहोत. ते केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी त्यांच केंद्राचं काम करावं आम्ही आमचं राज्याचं काम करतो,” असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
“सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?. निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकतं. गडकरी साहेबांनी यापूर्वी निधी दिला आहे. काम पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होतं. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत. आता करोनाचं संकट आल्याने सुक्ष्म आणि लघू खूप सारे उद्योग अडचणीत आले आहेत. देशातील छोट्या उद्योगांसाठी एखादा निर्णय घेत येत असावा, असं वाटतं”, असं टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला होता.
नारायण राणेंचं प्रत्युत्तर
“अजित पवार अजून अज्ञान आहेत. आपल्या खात्याचं बघा…अजून मी राष्ट्रवादीकडे अद्याप वळलेलो नाही. आपल्यावरील आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकलं पाहिजे.” “माझ्या खात्याला अर्थमंत्र्यांकडून निधी मिळतो. पंतप्रधान योजनांना पंतप्रधान निधी देतात. माझ्याकडे असणाऱ्या योजनांना एकाच वेळी साडे चार लक्ष निधी दिला होता. त्यातील तीन लक्ष कोटी खर्च झाला, अजून एक कोटी २५ लक्ष शिल्लक आहेत. याशिवाय वर्षभरात येणाऱ्या मागण्या पाहतात अर्थखातं पैसे देणार,” असं उत्तर नारायण राणेंनी दिलं होतं.