राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा वाहत असलेले माजी मंत्री भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाला कोकणातील पक्षनेत्यांनीच आव्हान दिले असून पक्षश्रेष्ठी मात्र त्यांच्याकडे काणाडोळा करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात काही महिन्यांपूर्वी झालेल्या खांदेपालटामध्ये जाधव यांचे मंत्रिपद काढून घेऊन त्यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, तर मंत्रिपदाची माळ रत्नागिरी जिल्ह्य़ातील त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी आमदार उदय सामंत यांच्या गळय़ात पडली. सुरुवातीला दोघांनीही नवीन जबाबदाऱ्या पार पाडताना एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या. पण मंत्रिपद गेल्यापासून आपल्या गुहागर मतदारसंघासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून एक रुपयाचाही निधी मिळाल्याची तक्रार जाधव यांनी काल येथे आले असता करत जिल्हाधिकारी राजीव जाधव यांना धारेवर धरले, मात्र मंडळाचे अध्यक्ष सामंत यांच्याबरोबर कालच जेवण करूनही याबाबत ब्र काढला नाही. प्रदेशाध्यक्षांची तक्रार सामंतांच्या कानी जाताच त्यांनी तातडीने खुलासा करत गुहागरसाठी आपण एक कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी दिल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रवादीचे चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी तर गेल्या आठवडय़ात खास मेळावा घेऊन जाधवांवर घणाघाती हल्ला चढवला. पक्षाच्या सर्व पदांचे कदम यांनी राजीनामे दिले असून जाधवांना पदावरून खाली खेचेपर्यंत पक्षामध्ये परतणार नाही, अशी घोषणा या मेळाव्यात केली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, उपाध्यक्ष बाबाजी जाधव इत्यादींनी मेळाव्याला हजेरी लावत, जिल्हा तुमच्या पाठीशी आहे, असा उघड पाठिंबा दिला. यावर पक्षश्रेष्ठी काही भूमिका घेतील, अशी जाधवांना आशा होती. पण गेल्या आठ दिवसांत तसे काहीच न घडल्याने अखेर सोमवारी त्यांनी स्वत:च येथे पत्रकार परिषद घेऊन कदम यांच्या वक्तव्यांकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे जाहीर केले.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील ही डोकेदुखी कमी म्हणून की काय, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सावंतवाडीचे राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी थेट लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष जाधवांशी त्यांचे असलेले वितुष्टही जगजाहीर आहे. त्यामुळे अशा प्रकारे घोषणा करून त्यांचे नेतृत्व आपण मानत नसल्याचेच केसरकरांनी सूचित केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नेतृत्वाला कोकणातूनच आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा वाहत असलेले माजी मंत्री भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाला कोकणातील पक्षनेत्यांनीच आव्हान दिले असून
First published on: 30-10-2013 at 02:42 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp maharashtra president bhaskar jadhavs leadership get challenge from konkan zone