राज्यात महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून भाजपा आणि सत्ताधारी यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण सुरू असल्याचं दिसून येत आहे. निवडणुकांच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली “मी पुन्हा येईन” ही हाक विशेष चर्चेत राहिली. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी अनेकदा खोचक प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या त्याच वाक्याचा संदर्भत घेत पुन्हा एकदा खोचक टोला लगावला आहे. शिर्डीमध्ये पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या या दोघांनाही लक्ष्य केलं.

“आता ते माध्यमांनीच सांगावं!”

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेमध्ये जयंत पाटील यांनी आज शिर्डीमध्ये पक्षाच्या लोकांसोबत संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. “देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य गेल्या अडीच वर्षांपासून ऐकतो आहोत ते सत्यात कधी येईल हे माध्यमांनीच सांगावं”, असं म्हणत जयंत पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.

विरोधात बोलणं हे सोमय्यांचं काम!

दरम्यान, यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्यावर देखील निशाणा साधला. “किरीट सोमय्या विरोधात आहेत. त्यामुळे विरोधात बोलणे त्यांचे काम आहे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही”, असं पाटील म्हणाले.

Story img Loader