राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता अजित पवारांबरोबर शपथ घेतलेले ८ आमदार सरकारमध्ये स्थिर झाल्याचं चित्र दिसत आहे. उपमुख्यमंत्रीपदासह अजित पवारांना अपेक्षित अर्थखातंही मिळालं आहे. त्यांनी स्वपक्षीय आमदारांसह शिंदे गटाच्या आमदारांसाठीही निधी दिल्यामुळे शिंदे गटाच्या काही आमदारांनी समाधान व्यक्त केलं आहे. मात्र, असं असलं तरी एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी अजित पवारच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं विधान केल्यामुळे सरकारमध्ये गेलेल्या अजित पवार गटात नेमक्या काय घडामोडी होत आहेत, याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
अमोल मिटकरींच्या ट्वीटमुळे चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत ट्वीट केलं आहे. “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व…”, असं मिटकरींनी या ट्वीटमध्ये म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सातत्याने एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्यामुळे भाजपानं राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतलं, अशी टीका केली जात आहे. त्यामुळे सध्या अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अमोल मिटकरींच्या या ट्वीटवर बोलताना हसन मुश्रीफ यांनी १४५ च्या आकड्याचा उल्लेख केला. “फक्त पोस्टर्स लावून कोणीही मुख्यमंत्री होत नाही. त्यासाठी १४५ आमदार लागतात, ही गोष्ट अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना अनेकदा सांगितली आहे”, असं ते म्हणाले. मात्र, आता याचसंदर्भात त्यांचे मंत्रीमंडळातील व अजित पवार गटातील सहकारी अनिल पाटील यांनी टीव्ही ९ शी बोलताना आपली भूमिका मांडली आहे.
“अजित पवार सध्याच्या गणितात मुख्यमंत्री कसे होऊ शकतात?” जयंत पाटील यांचा प्रश्न, म्हणाले…
काय म्हणाल अनिल पाटील?
अनिल पाटील यांनी अमोल मिटकरींच्या म्हणण्याला दुजोरा दिला. मात्र, त्याचवेळी १४५ च्या आकड्याचा त्यांनी उल्लेख केला. “हे अमोल मिटकरी एकटे म्हणत नाहीयेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गल्लीपासून दिल्लीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत. ही आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. पण त्याबरोबर १४५ आमदारांचा आकडा गाठावा लागतो. तो गाठला गेला, तर १०० टक्के अजित पवारच राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री होतील. आत्ता तो आकडा आमच्याकडे नाहीये. त्यामुळे शिंदे सरकारच्या पाठिशी आम्ही सगळे आहोत”, असं अनिल पाटील म्हणाले.