राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वत:ला विरोधी पक्ष म्हणवून घेतात. सत्तेत जाण्यासाठी त्यांची लुटुपुटुची लढाई सुरू आहे. खरेच काम करायचे असेल तर आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने ८ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे केले. ते काँग्रेसतर्फे आयोजित विभागीय दुष्काळ परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
 राष्ट्रवादी काँग्रेसने अद्यापि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलनाचा कोणताही कार्यक्रम ठरवला नाही. त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे वाटते. ८ डिसेंबर रोजी नागपूर येथे ‘हल्ला बोल’ मोर्चा काढणार असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये तर बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मिळावे, अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते कधी शेतात गेले नाही, त्यामुळे त्यांना पाण्याचा दुष्काळ माहीत नाही. त्यांनी अधिकाऱ्यांकडूनही नीटशी माहिती घेतली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या पठडीतील व्यक्तीला शेतीतले फारसे कळत नाही. शहरी मानसिकतेतील व्यक्तीलाच भाजप आणि शिवसेनेने आतापर्यंत प्रमुख पद दिले असल्याचे ठाकरे म्हणाले. या सरकारचा रिमोट कंट्रोल नागपूरमध्ये आहे. ते जसे सांगतात, तसेच नेते वागतात. जवखेडासारख्या संवेदनशील घटनेची राज्यपालांनी योग्य ती दखल घेतली नाही. त्यांनी कुटुंबीयांची भेटही घेतली नाही. मुख्यमंत्र्यांवर या प्रश्नी टीका होत असल्याने ते रविवारी जवखेडय़ाला गेल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
 सोयाबीन बुडाले आहे, कापसाला कमी भाव आहे. भातपिकाचे नुकसान झाले आहे. दूध उत्पादक शेतकरी हैराण आहेत. ऊस उत्पादकांना भाव मिळाला नाही. या विरोधात मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी माजी मंत्री नितीन राऊत, आमदार अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे, अमर राजूरकर, चंद्रभान पारखे, अरुण मुगदिया, प्रकाश मुगदिया, नांदेडचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम आदींची भाषणे झाली.

Story img Loader