भारतीय जनता पार्टीचे नेते मोहीत कंबोज यांनी अलीकडेच “राष्ट्रवादीचा बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार” अशा आशयाचं ट्वीट केलं होतं. त्यांचा बोलण्याचा रोख हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होते. सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. अजित पवारांनंतर मोहीत कंबोज यांनी आपला मोर्चा रोहित पवारांकडे वळवला आहे. आज सकाळी कंबोज यांनी एक ट्वीट करत रोहित पवारांवर उपरोधिक टीका केली आहे.
“आपण ‘बारामती अॅग्रो’ कंपनीबाबत सविस्तर अभ्यास करणार आहोत. या कंपनीच्या यशोगाथेबाबत मी स्वत: वैयक्तिक अभ्यास करायला सुरुवात केली आहे. लवकरच याचा एक सविस्तर अहवाल मी सादर करणार आहे. त्यामुळे युवकांना कंपनीची यशोगाथा समजून घेण्यास मदत होईल” अशा आशयाचं उपरोधिक ट्वीट कंबोज यांनी केलं आहे. या ट्वीटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोहीत कंबोज यांच्यावर निशाणा साधला आहे.
कंपनीचा अभ्यास करण्यासाठी आधी स्वत:कडे तेवढा मेंदू असावा लागतो. मोहीत कंबोज कुणाच्या इशारावर चालतात आणि त्यांच्यामागे कुणाचा मेंदू आहे, हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे कंबोज नावाच्या भोंग्याला फार महत्त्व द्यायची गरज नाही, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
हेही वाचा- “मोहीत कंबोज यांनीच तीन बँकांना चुना लावला” रोहित पवारांचं प्रत्युत्तर, ५२ कोटींचाही केला उल्लेख
मोहीत कंबोज यांनी रोहित पवारांवर केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता, मिटकरी म्हणाले की, “मोहीत कंबोज कोण आहे? अभ्यास करण्यासाठी त्याच्याकडे तेवढा मेंदू असावा लागतो. तो कुणाच्या इशाऱ्यावर चालतो आणि त्याच्यामागे कुणाचा मेंदू आहे, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे मोहीत कंबोजला उत्तर देण्यासाठी रोहित पवार समर्थ आहेत.”
हेही वाचा- अजित पवारांनंतर आता रोहित पवारांवार निशाणा, ट्वीट करत मोहित कंबोज म्हणाले, “बारामती अॅग्रो कंपनीचा…”
“मोहीत कंबोजने आणखी सखोल अभ्यास करावा, हवं तर बारामतीला जावं, बारामतीचा झालेला विकास बघावा, वेळ मिळाला तर तिथे नाक घासावं आणि थोडीफार अक्कल शिल्लक असेल तर त्याने आपल्या भागातही असा विकास करून दाखवावा. रोहित पवारांविरोधातील कंबोज यांचं ट्वीट म्हणजे महाराष्ट्राच्या मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. त्यामुळे कंबोज नाव्याच्या भोंग्याला जास्त महत्त्व देऊ नये” अशा शब्दांत एकेरी उल्लेख करत अमोल मिटकरींनी खोचक टीका केली आहे.