भारतीय जनता पार्टीचे नेते मोहीत कंबोज यांनी अलीकडेच “राष्ट्रवादीचा बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार” अशा आशयाचं ट्वीट केलं होतं. त्यांचा बोलण्याचा रोख हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होते. सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. अजित पवारांनंतर मोहीत कंबोज यांनी आपला मोर्चा रोहित पवारांकडे वळवला आहे. आज सकाळी कंबोज यांनी एक ट्वीट करत रोहित पवारांवर उपरोधिक टीका केली आहे.
या सर्व घडामोडींनतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोहीत कंबोज यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. “रोहित पवारांविरोधातील कंबोज यांचं ट्वीट म्हणजे महाराष्ट्राच्या मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. त्यामुळे कंबोज नाव्याच्या भोंग्याला जास्त महत्त्व देऊ नये. आम्ही अशा बकवास चर्चांकडे कधीच लक्ष देत नाही, आम्ही आमची कामं करतो” असं प्रत्युत्तर मिटकरींनी दिलं आहे.
हेही वाचा- “आधी अजित पवारांची माफी, मग उपमुख्यमंत्री पदावरून फडणवीसांवर निशाणा” धनंजय मुंडेंची तुफान टोलेबाजी!
अजित पवारांच्या कामांचा उल्लेख करत मिटकरी पुढे म्हणाले की, “अजित पवार हे स्वत: दोन दिवस मेळघाट दौऱ्यावर होते. त्यांनी मेळघाटात जाऊन कुपोषितांचे प्रश्न जाणून घेतले. कंबोज यांनीही एकदा मेळघाटात जावून गोरगरीबांची व्यथा जाणून घ्यावी. कंबोज हा काजू, बदाम आणि खारका खाऊन गलेलठ्ठ झाला आहे. त्याने कुपोषण झालेल्या लोकांची परिस्थिती बघावी. लोकं एकवेळचं जेवण करून कसं जगतात? हे बघावं. केवळ एसीमध्ये बसून गप्पा मारायला आणि बिन बुडाचे आरोप करायला काय जातं? हत्तीसारखं शरीर असलेल्या कंबोजने एकदा मेळघाटात जावं, गोरगरीबांची व्यथा पहावी आणि संबंधित प्रश्नांवर बोलावं” असा एकेरी उल्लेख करत मिटकरींनी खोचक टीका केली आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
हेही वाचा- “कंबोज नावाच्या भोंग्याला…” रोहित पवारांवरील ट्वीटनंतर अमोल मिटकरींची खोचक टीका!
दरम्यान, त्यांनी महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही टोलेबाजी केली आहे. अब्दुल सत्तार यांच्या नांदेड दौऱ्यावरून बोलताना मिटकरी म्हणाले की, “महाराष्ट्राच्या मत्रिमंडळाला अब्दुल सत्तार नावाचे दिव्यपुरुष कृषीमंत्री लाभले आहेत. त्यांनी रात्री एक वाजल्यानंतर नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. शेतात पाणी आणि अंधार पडला असताना सत्तार यांनी नांदेड दौरा करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या अग्नीपुरुष, दिव्यपुरुषांच्या यादीत अब्दुल सत्तारांचं नाव गेलंय. ओला दुष्काळ जाहीर करा, नाही तर खुर्च्या खाली कराव्या लागतील. पुढील पाच दिवस आम्ही संपूर्ण सभागृह दणाणून सोडणार आहोत” असंही मिटकरी यावेळी म्हणाले.