राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांना चार दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त समोर आलं होतं. हे वृत्त समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. प्रकृतीबाबत समस्या निर्माण झाल्यानंतर रविवारी रात्री उशिरा एअर अॅम्ब्युलन्सद्वारे एकनाथ खडसेंना तातडीने मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. यानंतर आता त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट लिहून प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.
‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये एकनाथ खडसे म्हणाले, “मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी प्रकृती आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईन. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहता. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद! महाराष्ट्रातील सर्व नागरिक बंधु-भगिनींना दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!”
४ दिवसांपूर्वी आमदार एकनाथ खडसे यांना छातीत त्रास होत होता. त्यानंतर त्यांना जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी काही चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं होतं. पण खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी रात्री त्यांना हवाई अॅम्ब्युलन्सने मुंबईलला आणण्यात आलं. आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच पुन्हा सेवेत रुजू होईन, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.