केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. अमित शाह यांनी काल (२३ सप्टेंबर) मुंबईत लालबागच्या राज्याचं दर्शन घेतलं. दरम्यान, त्यांनी मुंबईत काही राजकीय चर्चा आणि बैठकाही घेतल्याचं बोललं जात आहे. अमित शाह यांच्या या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. अजित पवारांच्या गैरहजेरीमुळे विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
दुसरीकडे, अजित पवार यांनी काल बारामतीत अर्थमंत्रीपदावरून मोठं विधान केलं आहे. “आज माझ्याकडं अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, यापुढं अर्थखातं टिकेल की नाही टिकेल, हे सांगता येत नाही,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार महायुतीत नाराज असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा : “२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”, भाजपा आमदाराच्या वक्तव्यावर शिंदे गटातील नेते म्हणाले…
गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांना डावललं जात आहे, अशी भावना त्यांच्या मनात दिसतेय, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजित पवारांच्या नाराजीवर एकनाथ खडसे म्हणाले, “अजित पवार महायुतीत राहिले की नाही राहिले, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांना डावललं जात आहे, अशी भावना त्यांच्या मनात दिसतेय. त्यामुळे त्यांनी नाराजीची भावना व्यक्त केली असावी.”
हेही वाचा- सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
सहकारी संस्थांना अर्थबळ पुरवण्याबाबत अजित पवार म्हणाले, “टोरंटो सीएनजी गॅस एजन्सी देत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच खरेदी विक्री संघासाठी टोरंटो गॅस एजन्सी घेतली. शेवटी आपल्या संस्था ताकदवान आणि आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत. आज माझ्याकडं अर्थखात आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही. मात्र, खरेदी विक्री संघ, दूध संघ, बारामती बँक, माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखाना हे पण ताकदीचे झाले पाहिजेत. तिथे चुका होत असतील, तर दुरूस्त केल्या पाहिजेत.”