सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत (CJI Uday Lalit) यांचा काल मुंबई उच्च न्यायालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांवर कौतुकाचा वर्षाव केला होता. यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत (CJI Uday Lalit) एका व्यासपीठावर बसणे हे संकेतांना धरून नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील</strong>
“सरन्यायाधीश यांना व्यासपीठावर बसवणं चुकीचं आहे. घटनापीठाकडे खटला सुरू असताना सरन्यायाधीशांना कार्यक्रमात नेणं हे चुकीचं आहे”,असं जयंत पाटलांनी म्हणलं आहे. याबाबत राज्यपालांना भेटणार का, असा प्रश्न विचारला असता याबाबत टाइमपास करायला आमच्याकडे वेळ नाही, अशी खोचक प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.
सचिन सावंत यांची टीका
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे फडणवीस सरकारची वैधता आणि कायदेशीरता स्वतः माननीय सर्वोच्च न्यायालयाद्वारे तपासली जात असताना आणि केवळ सध्याचे राज्य सरकारच नाही तर राज्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला देखील अपात्र ठरवले जाऊ शकते अशी परिस्थिती असताना व्यासपीठावरील विसंगती उठून दिसणे साहजिकच आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे ते न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ ठरतील या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.