अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. एवढंच नव्हे तर आपणच पक्षाचे अध्यक्ष आहोत, अशा आशयाचं पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवलं आहे. या पत्रावर ४० आमदारांच्या सह्या असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांच्या या कृत्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मला अजित पवारांची मानसिकता महाराष्ट्राला सांगायची आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी टीकास्र सोडलं आहे. अजित पवारांनी पक्षावर ठोकलेल्या दाव्याबाबत विचारलं असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मला त्यांची (अजित पवार) मानसिकता महाराष्ट्राला सांगायची आहे. आपण जी राक्षसी महत्त्वकांक्षा म्हणतो, ती महाराष्ट्राला सांगायची आहे. त्या काकाला (शरद पवार) पूर्णपणे गिळून टाकायचं आहे, ही राक्षसी महत्त्वकांक्षा त्यांनी स्वत: महाराष्ट्रापुढे उघड केली आहे.”

हेही वाचा- “कर्तृत्ववान मुलगा आपल्या म्हाताऱ्या बापाला…”, अजित पवारांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

अजित पवारांना उद्देशून जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “तुम्ही किती तारखेला निवडणूक आयोगाकडे गेले होते? आणि किती तारखेला जाहीर केलं? तुम्ही १ किंवा २ जुलैला निवडणूक आयोगाकडे जाता आणि ५ जुलैला हे जाहीर करता. तोपर्यंत सगळं लपवून ठेवता. तुम्ही कायद्याच्या सगळ्या बाजू गुंडाळून या देशाला कोणत्या दिशेनं घेऊन जात आहात.”

हेही वाचा- शरद पवारांकडे संख्याबळ किती? बैठकीला कोणते आमदार-खासदार उपस्थित? पाहा संपूर्ण यादी

“मला या गोष्टीचं वाईट वाटतं की, ज्या शरद पवारांनी हा वटवृक्ष निर्माण केला. त्यालाच घरट्यातूनच बाहेर काढायचं. शरद पवारांनी तुमची कोणतीच महत्त्वाकांक्षा कधीच रोखली नाही. १९९० पासून मी सगळ्यांना बघितलं आहे,” असंही आव्हाड म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla jitendra awhad on ajit pawar about terminate sharad pawars political power rmm
Show comments