मुंब्र्यातील शिवसेना शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात वादाला तोंड फुटलं आहे. शिंदे गटाने मुंब्र्यातील शाखा पाडल्यानंतर त्याठिकाणी तात्पुरती नवीन कंटेनर शाखा उभारली आहे. या शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
ज्या जितेंद्र आव्हाडांनी शिवसेनेच्या शाखा पाडल्या, त्याच आव्हाडांबरोबर आज उद्धव ठाकरे आहेत, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली. म्हस्के यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी संतप्त उत्तर दिलं आहे. “त्या नासक्याला सांगा, एक उदाहरण दे…” असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाडांनी दिलं. ते उद्धव ठाकरे यांच्या समवेत पत्रकार परिषदेत उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे प्रत्युत्तर दिलं.
हेही वाचा- “शाखा पाडली, बॅनर्स फाडले, निवडणुकीत तुमची मस्ती फाडतो”, मुंब्र्यात उद्धव ठाकरे कडाडले
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (११ नोव्हेंबर) मुंब्र्यातील जमीनदोस्त झालेल्या शाखा स्थळाला भेट दिली. ते हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी तिथे शिंदे गटाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही गटांत मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बॅरिकेड्सजवळून घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते.
हेही वाचा- “माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी…”, मुंब्र्यातील शाखेवरून उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केली. ही शाखा गुंडगिरी करत शिंदे गटाकडून बळकावली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. तर या ठिकाणी शाखेची नव्याने उभारणी केली जात असल्याचा दावा शिंदे गटाने केला. त्याचे भूमिपूजनही पार पडले आहे.