राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हिवाळी अधिवेशनात महापुरुषांच्या बदनामीवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे भाजपाला आयतेच कोलीत मिळाले आहे. अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन झाल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड भाजपाच्या निशाण्यावर आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांची एक व्हिडिओ क्लिप आणि चंद्रपूर येथील दर्ग्यातील फोटो ट्विट करुन जितेंद्र आव्हाड यांनी बावनकुळे यांना कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर आक्रमक प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता पुन्हा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर प्रतिआव्हान दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापुर्वी ट्विट करत म्हटले की, “मी कधीच कुणावर वैयक्तिक कंबरे खाली वार करत नाही कुणाचे नाव घेऊन टीका करत नाही पण माझ्यावर हल्ला केल्यास मला प्रतिउत्तर द्यावे लागेल. तेव्हा एकमेकानवर वैयक्तिक हल्ला करू नका”

प्रकरण नेमके काय आहे?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपुर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती. यात एका हिंदी पत्रकारांने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना चंद्रशेखर बावनकुळेंनी ‘औरंगजेबजी’ असा उल्लेख केला होता. त्यांचा हा व्हिडिओ ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना चिमटा काढला होता. या टीकेला उत्तर देताना आज वसई-विरार येथे पुन्हा पत्रकार परिषद घेऊन चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण दिले. मी जितेंद्र आव्हाड यांच्या मनातच औरंगजेबजी आहेत, असा उपरोधिक टोला लगावला असल्याचे त्यांनी सांगितले.

आव्हाड यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला औरंगजेबजी असा उल्लेख

जितेंद्र आव्हाड हे फक्त चंद्रशेखर बावनकुळेंचा व्हिडिओ ट्विट करुनच थांबले नाहीत तर त्यांनी भापजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि चंद्रशेखर बावनकुळे हे एका दर्ग्यात फुले वाहताना दिसत आहेत. मात्र जितेंद्र आव्हाडांनी या फोटोला कॅप्शन दिले की, “औरंगजेबजीच्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळेजी”. या ट्विटनंतर व्यथित झालेल्या बावनकुळे यांनी इतका ‘नीचपणा’ कसा काय करता, असा प्रश्न उपस्थित केला. याच ट्विटला आता पुन्हा जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे.

“पवित्र दर्ग्याचं दर्शन घेतानाची तुलना तुम्ही औरंगजेबाच्या कबरीशी केली आहे. आम्ही धर्माच्या विरुद्ध असतो, तर अटल बिहारी वाजपेयींच्या काळात अब्दुल कलामांना राष्ट्रपती केलं नसतं. धर्म पवित्रच असतो. आमचा विरोध दहशतवादी विचारसरणीला आहे. तुम्ही मुस्लीम समाजाचा, त्या भावनांचा अनादर केला आहे”, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla jitendra awhad revert back to chandrashekhar bawankule on his comment kvg